मुंबई - थोड्याच वेळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. मुंबईतील शिवाजी पार्कवर हा शपथविधीचा सोहळा रंगणार आहे. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून प्रत्येकी २ नेत्यांना मंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे. एकूण ६ जण उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शपथ घेणार आहेत.
हे नेते घेणार शपथ
उद्धव ठाकरे यांच्याबरोबर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि आमदार नितीन राऊत हे मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे शपथ घेणार आहेत. तर शिवसेनेकडून गटनेते एकनाथ शिंदे आणि ज्येष्ठ नेते सुभाष देसाई हे शपथ घेणार आहेत.
उद्धव ठाकरे यांचे नवीन मंत्रिमंडळ कसे असेल याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. उद्धव ठाकरेंच्या नवीन मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचा उपमुख्यमंत्री असणार आहे. मात्र, राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री कोण हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. तर विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडे ठेवण्यात आले आहे.