मुंबई - आज आंतरराष्ट्रीय पातळीवर जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. मात्र, लिंग परिवर्तन करून हिंदू पद्धतीने लग्न केलेल्या बॉबी डार्लिंग या हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहऱ्याला आपले लग्न वैध आहे, हे सिद्ध करण्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागत आहे.
बॉबीने दीड वर्षांपूर्वी लिंग परिवर्तन करून भोपाळच्या एका तरुणाशी विवाह केला. मात्र, लग्नाच्या दीड वर्षांतच तिला आलेल्या कटू अनुभवानंतर तिने घटस्फोटासाठी अर्ज केला. मात्र, हे लग्नच वैध नाही, कारण बॉबी ही हिंदू कायद्यानुसार मुलगी नाही, असा दावा तिच्या पतीच्या वकिलांकडून करण्यात आला. यामुळे बॉबीसमोर एक नवीन पेच निर्माण झाला आहे. आपली ओळख सिद्ध करण्यासाठी तिची न्यायालयीन लढाई सुरू आहे. या सर्वांत तिला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, माझा आपल्या न्याय व्यवस्थेवर संपूर्ण विश्वास असून ही लढाई जिंकणार असा विश्वास व्यक्त केला.
हिंदू कायद्यानुसार दोन व्यक्ती लग्न करू शकतात, त्यामुळे बॉबीची बाजू ठामपणे न्याय व्यवस्थेसमोर मांडण्यात येते, असे बॉबीची केस लढणाऱ्या वकील भावना जाधव यांनी म्हटले. तर बॉबीसोबत झालेला प्रकार दुर्दैवी आहे, महिला आयोग तिला सर्वोतोपरी मदत करेल, असे महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले.