मुंबई - टाटा सामाजिक विज्ञान केंद्रातील विद्यार्थ्यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात तसेच दिल्लीतील जामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ मोर्चा काढला. देवनारपासून चेंबूर रेल्वे स्थानकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.
हेही वाचा - हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आक्रमक; विधानभवनाच्या पायऱ्यावर घोषणाबाजी
नागरिकत्व सुधारणा कायदा संसदेत पारित झाल्यानंतर या कायद्याच्या विरोधात देशात सर्वत्र आंदोलन होत आहेत. रविवारी दिल्लीतील जामिया विद्यापीठात या कायद्याच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला. याचाच निषेध म्हणून टाटा सामाजिक विज्ञान केंद्रातील विद्यार्थ्यांनी हा मोर्चा काढला. हे विधेयक केंद्र सरकारने परत घेऊन सर्व समाजातील लोकांना देशात राहण्याचा हक्क द्यावा. कोणत्याही जाती धर्मावर अन्याय करू नये, अशी मागणी करत मोर्चा काढला.