मुंबई- केंद्र सरकारने देशाच्या सुरक्षिततेला धोका असल्याने 59 चिनी अॅपवर बंदी घातली. यामध्ये टिकटॉकचाही समावेश आहे. भारताने बंदी लागू केल्यानंतर गुगलने प्ले स्टोअरवरून टिकटॉक अॅप हटविले आहे, तर अॅपल कंपनीने स्टोअरवरून टिकटॉक काढून टाकले आहे. त्यामुळे टिकटॉक कंपनीला मोठा फटका बसला आहे. मात्र, काहीजण व्हीपीएन, प्रॉक्सी सर्वरच्या माध्यमातून टिकटाॅकचा वापर करत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
भारतात चिनी अॅपच्या माध्यमातून होत असलेल्या हेरगिरी, सायबर हल्ले व सायबर लूटीला घेऊन केंद्र सरकारने टिकटाॅकसह अन्य अॅपवर बंदी आणली. भारतात जवळपास 15 कोटी टिकटाॅकटचे वापरकर्ते होते. कायदेशीर परवानगी नसतानाही टिकटॉकचा वापर प्रॉक्सी सर्व्हरच्या माध्यमातून करणे हे धोकादायक असल्याचे सायबर एक्सपर्ट अंकुर पुराणिक यांनी म्हटले आहे. कुठल्याही व्हिपीएन (vpn) किंवा प्रॉक्सी सर्व्हरच्या माध्यमातून टिकटॉक अॅप डाऊनलोड केल्यास मोबाईल, संगणक, लॅपटॉपमध्ये मालवेअर व्हायरस पोहोचू शकतो. याद्वारे देशाबाहेर बसलेले सायबर गुन्हेगार तुमच्या मोबाईलमधील फोन नंबर, लोकेशन, तुमची वैयक्तिक माहिती चोरी करू शकतात.