मुंबई : कोविड नंतर मुंबईत प्रथमच मुंबई मॅरेथॉन झाले. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील अनेक मुली या मॅरेथॉनमध्ये धावल्या. खेडेगावातून आलेल्या या मुलींनी मुंबईकरांचा अक्षरशः दम काढला. २१ आणि १० किलोमीटरच्या स्पर्धेत शीतल जाधव आणि अमृता गायकवाड यांनी अनुक्रमे दोन आणि तीन क्रमांक पटकावला. तर गीतांजली भोसले हिने टॉप टेनमध्ये ५ वा क्रमांक मिळवला. अवघ्या ४५ मिनिटांत तिने हे अंतर पार केले.
पहिल्याच मॅरेथॉनमध्ये दुसरा आणि तिसरा क्रमांक औरंगाबादचा : पहिल्यांदा स्पर्धेत भाग घेतला. शाळेच्या मैदानात आणि मुंबईत धावताना वेगळीच मजा आली. खेडेगावात अशा सोयीसुविधा नाहीत, असे शीतल जाधव हिने सांगितले. तर अमृता गायकवाड हिने माझी पहिलीच मेरेथॉन होती. थोडं दडपण होतं, मात्र पाळयला सुरूवात केल्यावर मागे वळून पाहिले नाही. मला आज तिसरा क्रमांक मिळाला. यापूर्वी मोठ्या बहिणीने पहिला क्रमांक मिळवला आहे. आज मलाही पारितोषिक मिळणार असल्याने खूप आनंद होतो आहे, असे अमृता गायकवाड हिने सांगितले. शीतल जाधव हिला ५ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. भविष्यात हे अंतर कमी वेळेत अजून कसे कापता येईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ती म्हणाली.
खेडेगावातील छोट्याशा मैदानावर सराव : औरंगाबादमधील वैजापूर तालुक्यातील बाबुळगाव येथील आतापर्यंत अनेक मुली या मॅरेथॉनमध्ये धावत होत्या. सगळी शेतकऱ्यांची मुले असून; शाळेतल्या छोट्याशा मैदानावर सराव करतात. कोणत्या ही प्रकारच्या सुविधा नाहीत. तरीही या मुली शेकडो किलोमीटर पर्यंतचे अंतर पार करत आहेत. यात दिपाली तुपे नावाची मुलगी पहिली आली असून; बेस्ट ऑफ टेन मध्ये तिचा नंबर येईल. १० किलोमीटरमध्ये शितल जाधव, अमृता गायकवाड यांनी अनुक्रमे २ आणि ३ तर, गीतांजली भोसले हिने पाचवा क्रमांक मिळवला आहे, असे मार्गदर्शक आणि शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून गेल्या 32 वर्षांपासून कार्य करणारे सतीश पाटील यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या मुलीने केलेल्या कामगिरीने भारावून गेलो : औरंगाबाद येथे 'कोट्या प्री.सर्च फाउंडेशन' कापूस उत्पादकांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करते. आता शेतकऱ्यांच्या पाल्यांना विविध प्रकारच्या क्षेत्रात संधी देण्याचा ते प्रयत्न करत आहेत. या फाउंडेशनच्या सहकार्यामुळे आमच्या मुलींनी मुंबई मॅरेथॉनच्या स्पर्धेत उज्ज्वल यश प्राप्त केले आहे. फाउंडेशनचे चेअरमन धीरेन भाई यांचे यासाठी विशेष सहकार्य आहे. नैसर्गिक संकट, आपत्ती आणि आर्थिक परिस्थितीला नेहमीच येथील शेतकरी दोन हात करतात. त्या शेतकऱ्यांच्या मुलींनी केलेल्या कामगिरीने मी भारावून गेलो असून; मला याचा अतिशय आनंद होतो आहे, असे मार्गदर्शक सतीश पाटील यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर विजयी होतील : प्राथमिक शाळेच्या छोट्या मैदानात सराव करून; धावण्याच्या स्पर्धेत मुंबई सारख्या ठिकाणी भाग घेतला. या मुलींना कोणताही डाएट फॉलो केलेला नाही. शहरातील खेळाडूंसारखा डॉक्टरांचा सल्ला, वेळेनुसार आहार नाही. ग्रामीण भागात ठेचा, चटणी आणि भाकरी आहार असतो. हाच आहार घेत, या मुली मुंबई मॅरेथॉन पर्यंत पोहोचल्या आहेत. पुढे त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा विजयी होतील, असा विश्वास सतीश पाटील यांनी व्यक्त केला.