मुंबई - मुंबईतील सर्वात मोठा कंटेंटमेंट झोन असलेल्या धारावीमध्ये जीवाची बाजी लावत डोअर टू डोअर थर्मल स्क्रिनिंग करणाऱ्या तीन खासगी डॉक्टरांना गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली आहे. या डॉक्टरांची प्रकृती आता ठणठणीत असून, त्यांनी डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुन्हा कोरोनाच्या लढाई उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे डॉक्टर लवकरच आपल्या धारावीतील क्लिनिकमध्ये दिसतील, अशी माहिती धारावी-माटुंगा मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी डॉ. सुरेंद्र शिंगणापूरकर यांनी दिली आहे.
धारावीत रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी 10 ते 17 एप्रिल दरम्यान असोसिएशनने मुंबई महानगर पालिकेच्या मदतीने थर्मल स्क्रिनिंग घेतले. सगळी काळजी घेऊन ही स्क्रिनिंग मोहीम राबविणाऱ्या 25 पैकी 3 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्याना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोन डॉक्टर सोमैया तर एक डॉक्टर साई रुग्णालयात आहे. आता या तिघांची ही प्रकृती ठणठणीत आहे. मंगळवारी त्यांची कोरोनाची दुसरी चाचणी करण्यात आली आहे. त्यांच्यात कॊरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे उद्या, गुरुवारी अहवाल निगेटिव्ह आल्यास त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
डिस्चार्ज दिल्यानंतर काही काळ क्वारंटाईन पूर्ण करत ते डॉक्टर पून्हा नव्या जोमाने कामावर रुजू होणार आहेत. त्यांनीच तशी इच्छा व्यक्त केली असून, संकटातही धारावीतील आमच्या असोसिएशनचे डॉक्टर घाबरले नसून क्लिनिकद्वारे रुग्णसेवा देत असल्याचेही डॉ शिंगणापूरकर यांनी सांगितले आहे.