मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरला असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. औषधी वस्तूंचे व मास्कची साठेबाजी करू नये, असे प्रशासनाने आवाहन करूनही काही ठिकाणी विनापरवाना साठेबाजी तसेच विक्री होत असल्याचे आढळून येत आहे. 28 तारखेला गुन्हे शाखा 10 ने मुंबई उपनगरातील गोवंडी, बेंगणवाडी परिसरात स्वतःच्या फायद्याकरिता कोविड - 19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक वापरात येणाऱ्या 3 प्लाय मास्कचा मोठा साठा जप्त केला असून याची एकूण किंमत 97 लाख 16 हजार असून याप्रकरणी जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका महिलेसह 5 आरोपींना अटक केली आहे.
देशभरात संचारबंदी लागू असूनही मुंबईतील कोरोना विषाणूच्या रुग्णांचा आकडा वाढत आहे. प्रशासन अनेक उपाययोजना करीत आहे. मात्र, कोविड 19 च्या औषधी वस्तू व साहित्यांची साठेबाजी कमी होत नसल्याने मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा विविध ठिकाणी कारवाई करीत आहे. 28 मार्चला गुन्हे 10 चे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील माने यांना गुप्त माहिती मिळाली होती की, मुंबई उपनगरातील गोवंडी, बेंगणवाडी येथे बेकायदेशीर 3 प्लाय मास्कचा साठा शहरात विविध ठिकाणी विक्री केला जात आहे. माहितीनुसार प्रथम घटनास्थळी पोलीस कारवाईत या मास्कचे 2 लाख 97 हजार रुपयांचे 800 नग व 2 टेम्पो जप्त करून याप्रकरणी 5 लोकांना अटक केली.
सदरील गुन्ह्यातील आरोपी रिंकू थायल ही महिला गृहिणी असून तिचे पती रियल इस्टेटमध्ये एजंट आहेत. यापूर्वी ही महिला एका नामांकित कंपनीत कामाला होती. गेल्या काही वर्षांपासून ते बेरोजगार असल्याने घरातील आर्थिक स्थिती चांगली नसल्याने लाभापोटी पंचवीस रुपये प्रती नग या दराने विक्री करण्याच्या तयारीत होती. या गुन्ह्यात आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची पोलिसांना आशा असून आतापर्यंत पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. एकूण 3 लाख 87 हजार 800 या मास्कचे नग जप्त केले आहेत. याप्रकरणी 97 लाख 16 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.