मुंबई Threat To Mumbai Police : एका अज्ञात व्यक्तीनं मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज आल्यानं मुंबई पोलिसांची यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर वानखेडे स्टेडियमच्या आजूबाजूच्या परिसरात मुंबई पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. अज्ञात आरोपीनं ही धमकी मुंबई पोलिसांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केली आहे.
वानखेडे मैदानात घडवणार घातपात : आज वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड संघांमध्ये सामना होणार आहे. या सामन्यात घातपाताची घटना घडवून आणली जाईल, अशी धमकी अज्ञात व्यक्तीनं दिली आहे. त्यामुळे वानखेडे स्टेडियमच्या आजूबाजूच्या परिसरात आणि आसपासच्या परिसरात कडक दक्षता घेण्यात येत आहे. अज्ञात व्यक्तीनं आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये मुंबई पोलिसांना टॅग केलं होतं. या पोस्टमधील फोटोमध्ये बंदूक, हातबॉम्ब आणि बंदूकीच्या गोळ्या दाखवल्या होत्या. याबाबत माहिती देताना कायदा व सुव्यवस्था विभागाचे सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलं की, "अशा प्रकारची धमकी प्राप्त झाली असून त्याचा तपास मुंबई पोलिसांनी सुरू केला आहे. वानखेडे स्टेडियम आणि आजूबाजूच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त पोलिसांनी ठेवलेला आहे.
- फोटोमध्ये दाखवली शस्त्र : अज्ञात युझरनं एक्सवरील पोस्टमध्ये मुंबई पोलिसांना टॅग केलं. पोस्टमध्ये केलेल्या मेसेजसोबत बंदुक, हँडग्रेनेड आणि बंदुकीच्या गोळ्या दाखवल्या आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी वानखेडे स्टेडियम आणि त्याच्या आसपासच्या परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
तिकिटांचा काळा बाजार करणारा अटकेत : धमकी देणाऱ्या आरोपीचा मुंबई पोलीस कसून तपास करत आहेत. आज होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामान्याला येणाऱ्या प्रेक्षकांची कडक तपासणी केली जात आहे. सुरक्षा प्रोटोकॉलचं काटेकोर पालन केलं जाणार आहे. मंगळवारी मुंबई पोलिसांनी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी काळाबाजार करणार्यांवर कारवाई केली. त्यांच्याकडून प्रत्येकी 1.2 लाख किमतीची मॅचची तिकिटं जप्त केल्यानंतर एका आरोपीला अटक केली आहे. रोशन गुरुबक्षानी असं या अटक केलेल्या आरोपीचं नाव असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी दिली आहे. या कारवाई पूर्वीच सर जेजे मार्ग पोलीस ठाण्यातील पोलिसांनी मालाड येथून आकाश कोठारी या 30 वर्षीय व्यक्तीला उपांत्य फेरीची तिकिटे चढ्या दरानं विकताना अटक केली आहे. दोन ते अडीच हजार रुपयांची तिकीटे हा अटक आरोपी पस्तीस ते चाळीस हजार रुपयांना विकत असल्याचं पोलिसांना आढळून आल्याची माहिती प्रवीण मुंडे यांनी दिली आहे.
हेही वाचा :