मुंबई - पावसाळ्यात मुंबईकरांना दिलासा मिळावा म्हणून महापालिकेबरोबर राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध प्राधिकरणांनी योग्य समन्वय ठेवून कामे केली आहेत. त्यामुळे येत्या पावसाळ्यात मुंबईकरांना नक्कीच दिलासा मिळेल, असा विश्वास मुंबईचे महपौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे, महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत राणीबागेतील महापौर बंगला येथे बैठक झाली. या बैठकीत नालेसफाई, रस्त्यांची कामे तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱया साथीच्या रोगांबाबतची उपाययोजना, पावसाळ्यात खड्डे बुजविण्यासाठी वापरावयाचे कोल्डमिक्स आदी विषयांबाबत सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला. आपत्कालीन व्यवस्थापन विभागातर्फे मान्सूनपूर्व काळात घेण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचे संगणकीय सादरीकरण करण्यात आले.
मुंबईसाठी एकच प्राधिकरण असावे - उद्धव ठाकरे
महापालिकेच्या अखत्यारित असणाऱया सर्व आस्थापनांचे म्हणजेच रुग्णालये, शाळा, विभाग कार्यालयांचे दिशादर्शक फलक नागरिकांना आपत्कालीन प्रसंगी उपयोगी पडावेत, म्हणून प्रदर्शनी भागात लावावेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांसाठी ते महत्वपूर्ण भूमिका बजावतील. पालिका क्षेत्रात सार्वजनिक सेवा देणाऱ्या विविध संस्था असल्याने अडचणींच्यावेळी फक्त मुंबई महापालिकेवरच दोषारोप ठेवण्यात येतात, त्यामुळे मुंबईसाठी एकच प्राधिकरण असावे, अशी सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. महापालिकेने मान्सूनपूर्व कामे समाधानकारकरित्या केली असून, मुंबईकरांसाठी येणारा पावसाळा दिलासा देणारा असेल, अशी आशा ठाकरे यांनी व्यक्त केली.
सोशल मीडियाचा वापर करा - आदित्य ठाकरे
येत्या पावसाळ्यात पाणी साचण्याची २२५ ठिकाणे आहेत. त्यापैकी ३५ संवेदनशील पाणी साचण्यांच्या ठिकाणांची वाहतूक पोलिसांच्या मदतीने योग्य त्या पर्यायी उपाययोजना कराव्यात, तसेच सोशल मीडियाद्वारे येणाऱया तक्रारींबाबत त्वरित प्रतिक्रिया देण्यासाठी पालिकेने कार्यशाळाही घ्यावी, असे युवा सेनाप्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले.