मुंबई - चीनमधील कोरोना विषाणूने जगभरात हाहाकार उडवला आहे. या विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांचा बळी गेला आहे. मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात अद्यापपर्यंत दाखल करण्यात आलेल्या रुग्णाच्या रक्त चाचण्या केल्यावर एकाही रुग्णाला कोरोना व्हायरसची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे मुंबईकरांनी घाबरू नये, असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे.
जगभरात हाहाकार माजवणारा ‘कोरोना’ विषाणू आता भारतात पसरत आहे. केरळ आणि पंजाबनंतर आता महाराष्ट्रातही कोरोनाची लागण असलेले रुग्ण आढळले आहेत. त्यासाठी पालिका प्रशासनाकडून आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. यामध्ये विमानतळावर पालिका, राज्य सरकार आणि विमानतळ प्राधिकरणाच्या डॉक्टरांच्या टीमकडून २४ तास थर्मल स्कॅनिंग आणि आवश्यक तपासणी सुरू आहे. या तपासणीत गेल्या दोन दिवसांत आढळलेल्या १५ संशयितांच्या रक्त चाचण्या कस्तुरबा रुग्णालयात करण्यात आल्या. या सर्वांना कोरोना व्हायरसची लागण झाली नसल्याचे समोर आले आहे. कस्तुरबा रुग्णालयात आणखी ६ रुग्ण दाखल असून त्यांच्या रक्ताच्या चाचणीचे रिपोर्ट बुधवारी येणार आहेत.
पालिकेची यंत्रणा सज्ज -
पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात २८ बेडची व्यवस्था असून ‘कोरोना’ रक्तचाचणीही करण्यात येत आहे. शिवाय आपत्कालीन स्थितीसाठी पालिकेच्या महत्त्वाच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये व्यवस्था करण्यासाठी आराखडा तयार ठेवला आहे. याचबरोबर ‘कोरोना’शी लढण्यासाठी पालिकेने राजावाडी, कुर्ला भाभा, वांद्रे भाभा आणि जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर या रुग्णालयांमध्ये विशेष कक्ष सज्ज ठेवले असल्याची माहितीही पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
...तर कस्तुरबा रुग्णालयात उपचार घ्या -
‘कोरोना’ व्हायरसची लागण झाल्यास सर्दी, ताप, खोकला आणि श्वसनालाही त्रास होतो. न्युमोनियासारख्या या आजारात मूत्रपिंडही निकामी होऊ शकते. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप अशा आजारांत पाच दिवस औषधोपचार करूनही आराम पडला नाही तर कस्तुरबा रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.