मुंबई - भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये काल भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही एकमेकांचे शत्रू नाहीत, असे राऊत म्हणाले.
'माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी काही विषयांवर चर्चा करण्यासाठी आम्ही भेटलो. आमच्या दोघांमध्ये वैचारिक मदभेद असू शकतात. मात्र, शत्रुत्व नाही, असे संजय राऊत म्हणाले.
'ते माजी मुख्यमंत्री आहेत. तसेच विरोधी पक्षनेते आणि बिहार निवडणुकीचे प्रभारी आहेत. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'साठी मुलाखत घेण्यासाठी आमची बैठक आधीपासूनच ठरली होती. मात्र, कोरोना आणि इतर कारणांमुळे मुलाखत होऊ शकली नव्हती. या बैठकीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही माहिती होती. आम्ही बंकरमध्ये बसून नाही तर, खुल्या ठिकाणी बैठक घेतली, असे संजय राऊत म्हणाले.
मागील वर्षी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवरून शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडला. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. तेव्हापासून भाजपा आणि शिवसेनेत दुरावा आला आहे. त्या पार्श्वभूमीवर राऊत आणि फडणवीस यांच्या भेटीवरून राजकीय चर्चांणा उधाण आले होते. मात्र, संजय राऊत यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
शिरोमणी अकाली दलही काल (शनिवार) एनडीएतून बाहेर पडला. त्यांच्याशी संजय राऊत यांनी चर्चा केली. यावर ते म्हणाले, 'शिवसेना आणि अकाली दल एनडीएतील महत्त्वाचे पक्ष होते. आम्ही सत्तेत आणि विरोधातही एकत्र होतो. शिवसेनेला नाईलाजास्तव एनडीए सोडावी लागली. आता अकाली दलही बाहेर पडला आहे. ते १९९६पासून आघाडीत होते. आता एनडीएला नवे सहकारी मिळाले आहेत. माझ्याकडून त्यांना शुभेच्छा. शिवसेना आणि अकाली दलाचा समावेश नसलेल्या आघाडीला मी एनडीए समजत नाही, असे संजय राऊत यावेळी म्हणाले. कृषी विधेयकांना विरोध दर्शवत शिरोमणी अकाली दल पक्ष एनडीएतून बाहेर पडला आहे.