मुंबई -शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. लॉकडाऊनमुळे नागरिक घरी आहेत. मात्र, कोरोनाबाधित रुग्णाच्या घरात चोरी झाल्याचा प्रकार मुकुंद नगरमधील महात्मा फुले चाळीत घडला आहे. सर्व कुटुंबाला क्वारंटाईन ठेवल्याची संधी साधत चोरट्याने घरफोडी करून रोख रक्कम लंपास केली.
उपनगरातील चेंबूरच्या पी. एल. लोखंडे मार्गावरील झोपडपट्टीत मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्णाची भर पडत आहे. काही रुग्णावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच झोपडपट्टी असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. त्यामुळे रुग्णांच्या कुटुंबीयांना क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात आले आहे. या परिसरातील मुकुंद नगरमधील महात्मा फुले चाळीतील एका महिलेला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली. त्यामुळे तिच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात आले आहे. गुरुवारी रात्री चोरांनी कुलूप तोडून कपाटातील रोख रक्कम पळवली. तसेच घरातील वस्तू अस्ताव्यस्त केल्या आहेत. नेमकी किती रक्कम आणि कोणत्या वस्तू चोरीला गेल्या आहेत? हे पोलीस तपास आणि कुटुंब क्वारंटाईन काळ संपवून परतल्यानंतर समजेल. याबाबत त्यांच्या नातेवाईकांना टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.