मुंबई - मध्य रेल्वेवरील माटुंगा ते दादर रेल्वे स्थानकादरम्यान शुक्रवारी ( दि. 15 एप्रिल ) रात्री गदग एक्सप्रेस आणि दादर-पद्दुचेरी एक्स्प्रेसमध्ये ( Gadag Express ) धडक झाल्यामुळे तीन डब्बे रुळावरून घसरले. या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी काल रात्रीपासून हे घसरलेले तीन डब्बे रुळावर आणण्यासाठी युद्धपातळीवर रेल्वेने काम सुरू केले होते. मध्य रेल्वेचे 400 अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ताफा मिळून तब्बल 15 तासात रेल्वे मार्ग खुले करण्यात आले आहे.
जलद मार्ग 15 तासांनी खुला - मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे क्रमांक 11005 दादर ते पुद्दुचरी एक्सप्रेसचे मागील 3 डबे रुळावरून घसरले. दादरहून ही एक्स्प्रेस रवाना होताच. काल ( शुक्रवारी ) रात्री 9:45 च्या सुमारास माटुंगा स्थानकाजवळ गदग एक्स्प्रेस आणि दादर-पुद्दुचरी एक्सप्रेस धडक झाल्याने रुळावरून तीन डबे घसरले. त्यानंतर, मदतकार्याला सुरूवात झाली. घटनास्थळावर रेल्वे अधिकारी, कर्मचारी, पोलीस यंत्रणा, अग्निशमन दल पोहोचून डबे बाजूला करण्याचे काम सुरू केले. सकाळच्या सुमारास येथून घसरलेले तीन डबे हटविण्यात आले. त्यानंतर रेल्वे रुळ, ओव्हर हेड वायरची दुरूस्ती केली. त्यानंतर शनिवारी (दि. 16 एप्रिल) सकाळी अप जलद मार्गावरील सेवा सकाळी 8:30 वाजता सुरू केली. त्यानंतर या मार्गावरुन गाडी क्रमांक 22108 लातूर-मुंबई एक्स्प्रेस चालविण्यात आली. त्यामुळे अप जलद मार्ग 11 तासांनी खुला झाला. दुपारी 1:10 वाजता गाडी क्रमांक 22159 सीएसएमटी-चेन्नई एक्स्प्रेस डाऊन जलद मार्गावर धावली. त्यामुळे डाऊन जलद मार्ग 15 तासांनी खुला झाला.
उच्चस्तरीय चौकशी - घसरलेले डबे हटविण्यासाठी 400 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ताफा वापरण्यात आला. या कर्मचाऱ्यांमध्ये सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन विभाग, विद्यूत विभाग, अभियांत्रिकी विभाग यांचा समावेश होता. ही दुर्घटना सिग्नल बघण्याचा चुकीमुळे झाली, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. दादर-पद्दुचेरी एक्स्प्रेस दादरमधून सुटल्यामुळे या मार्गिकेवर लाल सिग्नल लागला होता. मात्र, सीएसएमटी-गदग एक्स्प्रेसने लाल सिग्नल तोडले. त्यामुळे या एक्स्प्रेसने दादर-पद्दुचेरी एक्स्प्रेसला धडक दिली. सध्या या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू झाली आहे. चौकशीनंतर या दुर्घटनेचे नेमके कारण समजणार आहे.