मुंबई - पालिकेचा महत्वपूर्ण असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यामुळे मुंबई महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठवण्यास नकार देत, पुढील सुनावणी २० ऑगस्टला ठेवली आहे. या प्रकल्पाला स्थगिती म्हणजे पालिका प्रशासनाला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
पश्चिम उपनगरामधील वाहतुकीवर उपाय म्हणून कोस्टल रोड बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. हा प्रकल्प मरीन ड्राईव्ह आणि बोरीवलीला जोडणारा असून, हा कोस्टल रोड 29 किलोमीटर लांबीचा असणार आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत 16 हजार कोटी रूपयांच्या जवळपास आहे. या प्रकल्पामुळे समुद्रातील जैवविविधतेवर आणि पर्यावरणावर परिणाम होईल. तसेच मच्छीमारांवरही याचा परिणाम होणार असल्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान कोस्टल रोडचे नव्याने काम करण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. याविरोधात पालिका सर्वोच्च न्यायालयात गेली होती. त्यावेळी उच्च न्यायालयाने लवकरात लवकर सुनावणी घेऊन याचिका निकाली काढावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. याबाबत पुन्हा उच्च न्यायालयात सुनावणी झाली असता नव्याने काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पुढील सुनावणी २० ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे.