नवी दिल्ली - राज्यातील सत्ताबदल आत जवळपास निश्चित झाला आहे. भाजप आणि शिवसेनेने काडीमोड घेतला आहे. त्या पार्श्वभूमिवर राज्यसभेत बदल दिसून आला. जे शिवसेना खासदार सत्ताधारी बाजुने बसत होते. त्यांना आजपासून विरोधी बाकांवर बसावे लागणार आहे. त्यानुसार आज आसन व्यवस्था बदलण्यात आली.
राज्यसभेत शिवसेनेचे तीन खासदार आहेत. यात शिवसेना नेते अनिल देसाई, संजय राऊत आणि उद्योजक राजकुमार धूत यांचा समावेश आहे. शिवसेना केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक होती. पण, शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेना रालोआमधून बाहेर पडली हे स्पष्ट झाले. पण, अधिकृतरित्या शिवसेना आणि भाजप दोघांनीही अशी घोषणा केली नाही. त्या पार्श्वभूमिवर आजची घटना महत्वाची आहे.
हेही वाचा - जम्मू-काश्मीरमध्ये आता उर्दू नव्हे; तर, हिंदी होणार व्यवहाराची भाषा
आतापर्यंत अनिल देसाई, संजय राऊत आणि धूत सत्ताधारी आघाडीचे भाग होते. अनेक मुद्यांवर राऊत राज्यसभेत सरकारची पाठराखण करताना दिसायचे. ३७० कलम किंवा राम मंदिराच्या मुद्यावर राऊत यांनी भाजपच्या सुरात सूर मिसळला आहे. आता विरोधी बाकांवर बसलेले राऊत आणि देसाई यांची भूमिका काय असेल हे पाहणे मोठे रंजक ठरणार आहे.
हेही वाचा - हिवाळी अधिवेशनात मोदी सरकार मांडणार नागरिकत्व विधेयक
राज्यातील सत्तास्थापनेची प्रक्रिया अद्याप अधांतरी लोंबकळलेली आहे. तिन्ही पक्षाकडून सरकार स्थापन होणार असे सांगितले जात आहे. पण, अंतिम निर्णय शरद पवार आणि सोनिया गांधींच्या भेटीनंतरच होईल असे काँग्रेस नेत्यांकडून सांगितले जात आहे. तसेच, भाजपकडूनही कालपासून सत्ता स्थापनेचा दावा केला जात आहे. त्यामुळे राज्यातील सत्तेचा संभ्रम अद्याप कायम आहे.