मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी एकूण 288 आमदारांपैकी 285 आमदारांनी मतदान (285 MLA Voting for Rajya Sabha Election 2022) केले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत हे सर्व मतदान पार पडले. सायंकाळी पाच वाजता मतमोजणीला सुरुवात (Rajya Sabha Election Counting) होणार होती पण आरोप प्रत्यारोपाच्या गदारोळात नवा ट्विस्ट आला आहे. मतदान करताना महाविकास आघाडीचे मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री यशोमती ठाकूर आणि आमदार सुहास कांदे यांनी मतपत्रिका पक्षाचे निवडणूक निरीक्षक यांच्या हातात दिल्याचा आक्षेप भारतीय जनता पक्षाने घेतला होता.
भारतीय जनता पक्षाचा हा आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांनी धुडकावत मतदान प्रक्रिया पूर्ण केली. मात्र भारतीय जनता पक्षाकडून हा आक्षेप केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोंदविण्यात आला. या आक्षेपानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने मतमोजणीची प्रक्रिया थांबवली आहे. अद्यापही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतमोजणी बाबत कोणताही निर्णय दिला गेलेला नाही. भारतीय जनता पक्षाच्या मूळ आक्षेपावर आता केंद्रीय निवडणूक आयोग मतदानाच्या वेळचे व्हिडिओ तपासून निर्णय घेणार आहे. मात्र मतमोजणी प्रक्रिया अद्यापही सुरू होऊ शकलेली नाही. भाजपच्या आक्षेपा नंतर काॅंग्रेसनेही भाजप सदस्यांच्या मतदानावर आक्षेप घेतल्याचे सांगितले जात आहे