मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवाजी पार्कमधील महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री व राज्यपाल आदी मान्यवर उपस्थित असतात. त्यांचे आदरतिथ्य महापौरांकडून केले जाते. मात्र, या वर्षापासून मान्यवरांचे आदरातिथ्य रस्त्यावर करण्याची नामुष्की महापालिकेवर येऊन ठेपली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी पार्क येथील अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन केले जाते. त्यासाठी मुख्यमंत्री, राज्यपाल आदी मान्यवर उपस्थित राहतात, त्यांचे आदरातिथ्य मुंबईचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांकडून केले जाते. शिवाजी पार्क जवळच महापौर निवासस्थान असल्याने मुख्यमंत्री व राज्यपाल चहापानाला उपस्थित राहतात. मात्र, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर बंगला ट्रस्टच्या स्वाधीन करण्यात आला आहे. यामुळे या वर्षापासून मान्यवरांचे आदरातिथ्य रस्त्यावर करण्याची नामुष्की महापालिकेवर येऊन ठेपली आहे. जुन्या महापौर बंगल्या शेजारीच पालिकेचा जिमखान्यासाठी भूखंड आरक्षित आहे. या भुखंडावर मुख्यमंत्री व राज्यपाल यांचे आदरातिथ्य केले जाणार आहे. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचे आदरातिथ्य रस्त्यावर करावे लागणार आहे.