मुंबई - मुख्यमंत्र्यांनी आज (दि. 10 एप्रिल) सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत टाळेबंदीबाबत चर्चा झाली असून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टाळेबंदीबाबत सकारात्मकता दर्शवली आहे. मात्र, टाळेबंदीबाबत निर्णय येत्या दोन दिवसात घेतला जाईल, असे बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. मात्र, राज्यात आठ ते दहा दिवस टाळेबंदी लावला जाईल, असे संकेत बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. सध्या राज्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्य सरकार समोर मोठे आव्हान तयार झाले आहे. त्यामुळे आज (शनिवार) मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती.
या बैठकीसाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अर्थमंत्री अजित पवार, काँग्रेस प्रदेशाद्याक्ष नाना पटोले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, टास्कफोर्स सदस्य डॉ.तात्याराव लहाने आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हे उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीलाच राज्याचे सचिव सीताराम कुंटे यांनी राज्यात कोरोनाच्या वाढत्या दाहकतेची गंभीरता सांगितली. रुग्ण संख्या राज्यभरात कशा प्रकारे वाढते आहे. याचा आढावा या बैठकीत कुंठे यांच्याकडून देण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्णय घेतल्याशिवाय आता पर्याय नाही, असे मत बैठकीत व्यक्त केले. राज्यभरात कडक निर्बंध लावलेच गेले पाहिजेत, असे या बैठकीत त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याच समर्थन केले. मात्र, पुण्यासाठी काही निर्बंध शिथिल करता येतील का? याबद्दल देखील विचारणा केली. मात्र, एका ठिकाणी वेगळे निर्बंध आणि दुसऱ्या ठिकाणी वेगळे निर्बंध, असे करता येणार नाही. संपूर्ण राज्यात कडक टाळेबंदी, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कमीत कमी पुढील आठ ते दहा दिवस तरी टाळेबंदी लावावा लागेल, अशा प्रकारचे स्पष्ट मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत बोलून दाखवला. तसेच काँग्रेसकडून अशोक चव्हाण यांनी तडक टाळेबंदी लावू नये, यासाठी लोकांना काही वेळ देण्यात यावा. अशा प्रकारच्या सूचना बैठकीत केल्या. मात्र, टाळेबंदीबाबत काँग्रेसकडूनही समर्थन करण्यात आले आहे.
टाळेबंदीबाबत उद्या टास्क फोर्सची बैठक
राज्यभरात टाळेबंदी लावण्याआधी मुख्यमंत्र्यांनी उद्या (दि. 10 एप्रिल) दुपारी टास्क फोर्सची बैठक बोलावली आहे. राज्यभरात टाळेबंदी कशा प्रकारे राबविण्यात यावा, तसेच राज्यात टाळेबंदी आधी कोणत्या उपाययोजना करण्यात याव्यात यासंबंधीची बैठक बोलवण्यात आलेली आहे. ही बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री टाळेबंदीबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.
टाळेबंदीला भाजपचा विरोध
बैठकीला विरोधी पक्षाकडून विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी राज्यभरात कडक टाळेबंदी लावू नयेत म्हणत लॉक डाऊनला विरोध केला. सरसकट टाळेबंदी न लावता निर्बंध कडक करण्यात यावेत, तसेच व्यापार यांना काही सूट देण्यात यावी अशा प्रकारची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीतून केली.
हेही वाचा - राज्यात 55 हजार 411 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 309 जणांचा मृत्यू