ठाणे Thane Crime : ख्रिसमस (नाताळ) आणि नवीन वर्षाचा जल्लोष उंबरठ्यावर आलाय. याच पार्श्वभूमीवर विविध हॉटेल्स आणि बार्समध्ये जुन्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या पार्ट्यांचं आयोजन केलं जाते. तसंच या पार्ट्यांमध्ये अमलीपदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. दरम्यान, अशाच पार्ट्यांसाठी कोकेन घेऊन आलेल्या एका नायजेरियन व्यक्तीला 31 ग्रॅम कोकेनसह गुन्हे शाखेनं अटक केलं आहे.
मुद्देमालासह आरोपीस अटक : 19 डिसेंबर रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना खबऱ्यानं आनंदनगर चेकनाका सर्व्हिस रोड, बस पार्किंग जवळ कोपरी ठाणे पूर्व इथं एक नायजेरीयन व्यक्ती कोकेन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती दिली होती. त्यावरुन सदरील ठिकाणी सापळा रचून ओकोरी इमॅन्युअल ब्राईट (वय 33 वर्षे, रा.प्रगतीनगर, नालासोपारा, ठाणे) याला ठाणे गुन्हे शाखा युनिट-5 च्या पथकानं ताब्यात घेतलं. यावेळी 31 ग्रॅम कोकेन, मोबाईल, रोख रक्कम आणि इतर वस्तू असा 12 लाख 51 हजार 368 रूपये किंमतीचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला. दरम्यान, गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आलेलं कोकेन आरोपी कोणाला विकणार होता, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
गुन्हा दाखल : दरम्यान, अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये आरोपी विरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच बुधवारी (20 डिसेंबर) आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलं असता, त्याला 26 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार माने (गुन्हे शाखा, घटक 5, वागळे, ठाणे) हे करीत आहेत.
हेही वाचा -