मुंबई : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) राजस्थानमध्ये स्फोटके जप्त केल्यानंतर 2022 च्या चित्तोडगड दहशतवादी प्रकरणात दोन दहशतवाद्यांना पुण्यातून अटक केली होती. आरोपी इस्लामिक स्टेट (इसिस) प्रेरीत दहशतवादी संघटना ‘अल-सुफा’चे सदस्य आहेत. मोहम्मद युनूस साकी, इम्रान खान उर्फ युसूफ अशी दोन दहशतवाद्यांची नावं आहेत. हे दोघेही दहशतवादी मध्य प्रदेशातील रतलाम येथील रहिवासी आहेत. त्यांना काल जयपूर येथील एनआयए विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.
दहशतवाद्याचा भाजला हात : महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यातील कोथरूड येथून मोहम्मद युनूस साकी, इम्रान खान उर्फ युसूफ या दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. 15 ऑगस्ट रोजी होणारा संभाव्य दहशतवादी हल्ला रोखण्यात दहशतवादी विरोधी पथकाला यश आलं होतं. या संदर्भात एटीएसच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं ईटीव्ही 'भारत'शी केलेल्या बोलताना सांगितलं की, पुण्यातील पोल्ट्री फार्ममध्ये आयईडी बॉम्ब तयार करताना दहशतवादी इम्रान खानचा उजवा हात भाजला होता. ही घटना एप्रिल ते मे महिन्याच्या सुमारास घडल्याचा अंदाज अधिकाऱ्यानं व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात मोठ्या घातापाताची शक्यता : 18 जुलैच्या रात्री कोथरूड पोलिसांनी दोन संशयित दहशतवाद्यांना वाहन चोरीच्या संशयावरून अटक केली होती. मोहम्मद युनूस साकी, इम्रान खान तसेच त्यांचा एक साथिदार शाहनवाज फरार झाला होता. पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात दहशतवाद्यांनी स्फोटक प्रात्यक्षिकाचं प्रशिक्षण घेतलं होतं. एका वरिष्ठ एटीएस अधिकाऱ्यानं सांगितलं की, साकी, इम्रान पुण्यातील एका पोल्ट्री फार्ममध्ये आयईडी बनवण्याचं प्रशिक्षण घेत होते. त्याचवेळी एक छोटासा स्फोट झाला होता. ज्यात इम्रानचा खानचा उजवा हात गंभीरपणं भाजला होता. एटीएसनं इम्रान, युनूसला पकडलं नसतं, तर महाराष्ट्रात मोठा घातापात होण्याची शक्याता होती.
दोघांवर 5 लाखांचं बक्षीस : या दोघांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून 4 मोबाईल फोन, एक तंबू, एक लॅपटॉप, एक काडतूस, स्फोटक पावडर जप्त केली होती. दोन्ही दहशतवादी अल सुफा संघटनेशी संबंधित आहेत. दोघांनाही बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायदा (यूएपीए) अंतर्गत एटीएसने 11 ऑगस्टपर्यंत ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर हे प्रकरण एनआयएकडं वर्ग करण्यात आलं होतं. एनआयएनं या दोघांवर 5 लाखांचं बक्षीस ठेवलं होतं. 15 ऑगस्ट रोजी एटीएसनं केलेल्या कारवाईमुळं दहशतवादी स्फोटाचा कट उधळून लावला होता.
हेही वाचा -