मुंबई - राणीबागेत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून २०१७ मध्ये पेंग्विन आणण्यात आले. या पेंग्विनच्या देखभालीसाठी पालिकेने पुढील ३ वर्षांसाठी १५ कोटींचे टेंडर काढले आहे. या खर्चाला विरोधी पक्षांनी विरोध केल्यानंतर पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी टेंडर मागे घेतले आहे. पालिकेने जास्तीतजास्त देखभाल करून होणार खर्च कमी करावा, असे आदेश आयुक्तांनी दिल्याची माहिती विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दिली.
पेंग्विनवर होणारा खर्च -
मुंबई महापालिकेच्या भायखळा येथील राणीबागेत म्हणजेच वीरमाता जिजामाता भोसले प्राणिसंग्रहालयात २०१७ मध्ये दक्षिण कोरियामधून हंबोल्ट पेंग्विन आणण्यात आले. त्यासाठी विशेष वातानुकुलित कक्ष उभारण्यात आला आहे. पेंग्विन खरेदीसाठी आणि या कक्षासाठी एकूण २५ कोटींचा खर्च झाला होता. त्यानंतर ३ वर्षाच्या देखभालीसाठी ११ कोटी खर्च झाले. त्यानंतर आता पुन्हा पुढच्या तीन वर्षांसाठी १५ कोटी खर्च अपेक्षित धरून टेंडर काढण्यात आले. पालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने या टेंडरला काँग्रेसचे पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी विरोध केला होता. तसेच भाजपाने विरोध केला होता. पालिकेने स्वता पेंग्विनची देखभाल करून होणार खर्च कमी करावा, अशी मागणी रवी राजा यांची होती. त्यानंतर पेंग्विनच्या देखभालीसाठी काढले जाणारे १५ कोटींचे टेंडर पालिका प्रशासनाकडून मागे घेण्यात आले आहे. पेंग्विनची जास्तीत जास्त देखभाल महापालिका प्रशासनाच्या अखत्यारितच करण्याचे महापालिका आयुक्तांनी आदेश दिले आहेत. पेंग्विनच्या देखभालीच्या टेंडरमध्ये फेरबदल करुन पुन्हा सादर करण्याचे आयुक्तांनी आदेश दिल्याची माहिती रवी राजा यांनी दिली.
हेही वाचा - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : 15 सप्टेंबरला आरोपींवर दोषारोपपत्र दाखल केले जाणार
३ वर्षेसाठी १५ कोटींचे टेंडर -
पेंग्विनच्या देखभालीसाठी पुढील ३ वर्षासाठी १५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यासाठी पालिकेने निविदा काढल्या आहेत. निविदा काढलेली रक्कम पेंग्विन प्रदर्शनाची देखभाल आणि वातानुकुलित सुविधा, लाइफ सपोर्ट आणि इलेक्ट्रिकल सिस्टीम, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा आणि पेंग्विनसाठी मासे, अन्न पुरवण्यासाठी खर्च केली जाईल.पेंग्विनच्या दररोजच्या देखभालीसाठी विशेष पशुवैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टर्स नेमलेले आहेत. दररोज पेंग्विनसाठी विशेष खाद्य, विशेष प्रकारचे मासे आणि इतर सप्लीमेंटस् दिल्या जातात. गेल्या तीन वर्षात एक नवजात पिल्लु पेंग्विन आणि एका नर पेंग्विनचा मृत्यू झाला आहे.