मुंबई - सध्या जगभरात पसरलेल्या कोरोनाची लागण राज्यातील काही भागात झाली असून या विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी राज्य शासनातर्फे अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. त्याचदृष्टीने नोव्हेल कोरोनो विषाणूचा (कोव्हीड - 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) प्रशासनातर्फे वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या म्हाडा मुख्यालयात तसेच प्रादेशिक मंडळांमधील कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची नोंद करण्यासाठी बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीचा वापर करण्यापासून पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात सूट देण्यात आली आहे.
म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांच्या निर्देशानुसार काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार बायोमेट्रिक उपस्थितीबाबत संगणकीय प्रणालीचा वापर करण्यास तात्पुरत्या सूट देण्याच्या कालावधीमध्ये प्रत्येक विभागातर्फे हजेरीपत्रक नोंदवहीमध्ये त्यांच्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची नोंद ठेवण्यात येणार आहे.
म्हाडा हे एक लोकाभिमुख कार्यालय असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करणारी भित्तीपत्रके म्हाडा मुख्यालयात तसेच विभागीय मंडळांच्या कार्यालयात लावण्याची निदर्शने देण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषयक सुरक्षेच्या दृष्टीने म्हाडा मुख्यालय आणि म्हाडाचे राज्यातील विभागीय मंडळांमधील स्वच्छतागृहांमध्ये पुरेशा प्रमाणात स्वच्छताविषयक सामुग्री (सॅनिटायझर्स) उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील या परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - BREAKING : मंत्रालयातही कोरोनाचा संशयित रुग्ण