मुंबई - एकीकडे कोरोनामुळे घाबरलेल्या मुंबईकरांना आता उन्हाचे चटके देखील सोसावे लागणार आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईचे तापमान कमालीचे वाढले आहे. काही प्रमाणात गारवा जाणवत असला तरी हळुहळू तापमान वाढत आहे. किमान आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक नोंदवले जात आहे.
मुंबईमध्ये आज (दि. 1) कुलाबा व सांताक्रूझ दोन्ही ठिकाणचे तापमान सरासरी दोन अंशांहून अधिक होते. मध्य महाराष्ट्रातही किमान तापमानामध्ये सरासरीपेक्षा मोठी वाढ झाली आहे. मुंबईमध्ये सांताक्रूझ येथे कमाल तापमान 35.4 तर कुलाबा येथे 32.2 अंश सेल्सिअस होते. सांताक्रूझ येथील कमाल तापमान गुरूवारपेक्षा किंचित कमी असले तरी आता तापमानाचा पारा हा चढा राहील, असा अंदाज आहे. तर किमान तापमान कुलाबा येथे 23.0 तर सांताक्रूझ येथे 20.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
मार्च महिन्यात मे महिन्याचा अनुभव
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांमध्ये मुंबईसह राज्याच्या तापमानात वाढ होणार आहे. मागील आठवड्यापासून कोकणच्या तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. तापमान वाढ पुढील काही दिवस अशीच राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे मुंबईकरांना मार्च महिन्यात मे महिन्याचा अनुभव मिळणार आहे. तसेच बदलत्या वातावरणामुळे आजाराचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
यंदा वाढू शकते 'एसी'ची मागणी
गेल्या वर्षी टाळेबंदी असल्यामुळे उन्हाची झळ मुंबईकरांना बसली नव्हती. मात्र, आता मुंबईकर बऱ्यापैकी घरातून बाहेर पडत आहेत. यामुळे उन्हाची झळ मुंबईकरांना बसणार आहे. गेल्या वर्षी टाळेबंदीमुळे एसीची (वातानुकूलित यंत्र) मागणी मोठ्या प्रमाणावर घटली होती. मात्र, यंदा मागणी वाढणार असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा - उपमुख्यमंत्री अजित पवारांची वीज तोडणीला स्थगिती; दोन दिवसात विजेच्या प्रश्नावर तोडगा काढणार