मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे स्थलांतरित मजुरांचे प्रचंड हाल होत आहेत, त्यांचे दुःख ऐकून डोळ्यात पाणी येते, अशा भावना माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनी व्यक्त केल्या. स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला असून यासंदर्भात आता केंद्राने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
केंद्राच्या निर्देशानुसार आता स्थलांतरित मजुरांना बसने त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे. या मजुरांची संख्या लाखोंच्या घरात असून त्यांना बस ऐवजी रेल्वेने पाठवण्यात यावे, अशी विनंती कृपाशंकर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतही चर्चा केली आहे. तसेच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबतही चर्चा केली असल्याचे सिंह यांनी सांगितले.
स्थलांतरित मजुरांचा रोजगार बुडाला असून त्यांच्या उदार निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर त्यांना त्यांच्या गावी जाण्याचीही ओढ लागली आहे. दिवभरात अशा हजारो लोकांशी याबाबत बोलणे होत असल्याचे सिंह यांनी सांगितले.