मुंबई - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने 30 एप्रिलपर्यत मिनी लाॅकडाऊन जाहिर केले आहे. मात्र, 23 व 29 एप्रिलपासून सुरू होणार्या दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी पर्यवेक्षक म्हणून उपस्थित राहणार्या शिक्षकांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. या चाचण्या 48 तासांसाठीच वैध राहणार आहे. त्यामुळे दर दोन दिवसांनी शिक्षकांना कोरोना चाचणी करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
परीक्षेला बसणार फटका
राज्य शासनाने कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्याच्या निमित्ताने शाळा पातळीवर शिक्षकांनाही काही निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्यावेळी उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांना आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल सादर करणे बंधनकारक केले आहे. खरं तर ही चाचणी 48 तासांसाठीच वैध राहणार आहे. त्यामुळे ही चाचणी वारंवार करावी लागणार आहेत, तसेच परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांची कोरोना लक्षणे ओळखून, लक्षणे आढळणाऱ्या विद्यार्थ्याला स्वतंत्र खोलीत बसवण्याची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. त्यामुळे या नियमाचा फटका दहावी, बारावीच्या परीक्षेला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आरटीपीसीआर चाचणीची व्यवस्था करावी
कोरोनाचे लक्षणे ओळखणे शिक्षकांना जमेलच असे नाही. विना तपास विद्यार्थ्यांना कोरोनाची लक्षणे आहेत, म्हणून त्यांना स्वतंत्र बसवून परीक्षा देताना त्यांच्या मानसिकतेचा विचार होणे आवश्यक आहे. तसेच यावेळी शिक्षक व पालक यांच्यातही वाद होऊ शकतो. याकरिता शासनानेच आरटीपीसीआर चाचणीची व्यवस्था करावी, याकरिता वैद्यकिय पथक नेमण्यात यावेत. तसेच विद्यार्थ्यांसोबत सर्व वयोगटातील शिक्षकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात यावी. अशी मागणी शिक्षक व पालक वर्गाकडून करण्यात येत आहे.
परीक्षा सबंधित शिक्षण मंत्र्यांची उद्या बैठक
दहावी-बारावीच्या परीक्षा संदर्भात शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उद्या(मंगळवार) बैठक घेणार आहेत. या बैठकीत शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित असणार आहेत. प्राप्त माहितीनुसार उद्याच्या(मंगळवार) बैठिकीत दहावी बारावीच्या परिक्षा पुढे ढकलण्याच्या संदर्भात आणि परीक्षांसाठी पर्यवेक्षक म्हणून उपस्थित राहणार्या शिक्षकांबद्दल महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-मुंबईत वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका कार्यालयात नागरिकांना प्रवेशास मनाई