मुंबई - शहराला सात धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. शहरात समाधानकारक पाऊस पडत नसला तरी धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणारे तानसा धरण आज २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.०५ मिनिटांनी ओसंडून वाहू लागले. मुंबईला पाणीपुरवठा करणारी सात पैकी चार धरणे पूर्णपणे भरली आहेत.
आज शुक्रवारपासून मुंबईत १० टक्के पाणी कपात लागू राहणार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात अपेक्षित पाणीसाठा जमा झाल्यावर पाणी कपात मागे घेतली जाणार आहे.
मुंबईला मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तुळशी व विहार या सात धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. या धारणक्षेत्रात गेले काही दिवस चांगला पाऊस पडत आहे. यामुळे तानसा धरण आज २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.०५ वाजता ओसंडून वाहू लागले आहे. गतवर्षी म्हणजेच २५ जुलै २०१९ रोजी ओसंडून वाहू लागले होते. तर त्याआधी २०१८ मध्ये १७ जुलै रोजी, २०१७ मध्ये १८ जुलै रोजी तर त्याआधीच्या वर्षी म्हणजेच २०१६ मध्ये हे धरण २ ऑगस्ट रोजी भरुन वाहू लागले होते.
मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधून दरदिवशी ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. तलावातील पाण्याच्या पातळीत घट होत असल्याने ५ ऑगस्टपासून २० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. तर २१ ऑगस्टपासून १० टक्के पाणी कपात मागे घेत १० टक्के पाणीकपात सुरू राहणार आहे. परंतु सध्या धरण क्षेत्रात सतत पडणाऱ्या पावसामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.
४ ऑगस्ट रोजी सातही धरणातील पाणीसाठा ५ लाख ५ हजार ८९६ इतका होता. परंतु, तलावांत पावसाची संततधार सुरुच असून सध्या म्हणजेच २० ऑगस्ट सकाळी ६ वाजेपर्यंत सातही धरणांत १२ लाख ६२ हजार ११९ दशलक्ष लीटर साठा इतका असून तो क्षमतेच्या ८७.२० टक्के एवढा आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारी सर्व धरणे काठोकाठ भरायला सुमारे दोन लाख दशलक्ष लिटर पाणी साठ्यात वाढ होण्याची गरज आहे.
सात धरणांपैकी २७ जुलैला तुळशी तर ५ ऑगस्टला विहार धरण ओव्हर फ्लो झाले. १८ ऑगस्टला मोडकसागर तर आज २० ऑगस्ट रोजी तानसा धरण भरून वाहू लागले आहे. २१ ऑगस्टपासून मुंबईत १० टक्के पाणी कपात केली असली तरी धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरुच आहे. त्यामुळे मुंबईकरांची वर्षभराची तहान भागेल इतका पाणीसाठा ऑगस्ट अखेरपर्यंत जमा होईल, असा विश्वास पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.