मुंबई - राज्यातील विविध भागात अतिवृष्टीमुळे अभूतपूर्व पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते व रहिवासी भागातही पाणी साचल्याने सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा बिकट परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री व राज्य आपत्ती निवारण प्रधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष असलेले देवेंद्र फडणवीस हे शासकीय खर्चाने पंचतारांकित प्रचारयात्रा काढण्यात व्यस्त आहेत. मुख्यमंत्र्यांनी तातडीने उपाययोजना करून जनतेला संकटातून न काढल्यास आम्ही जनतेसह मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षाचा ताबा घेऊ, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रचार समितीचे अध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री राज्यभर प्रचार दौरे करीत असल्याने संपूर्ण यंत्रणा मुख्यमंत्र्यांची बडदास्त ठेवण्यामध्ये व्यस्त आहे. राज्याच्या मुख्य सचिवापासून विभाग व जिल्हा स्तरावरील अधिकारी कोणतीही पावले उचलताना दिसत नाही. अशा कठीण परिस्थितीत माजी खासदार नाना पटोले यांनी आज मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, मुंबई प्रदेश काँग्रेस व काँग्रेस प्रचार समितीच्या नेत्यांची तातडीची बैठक घेतली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आपत्तीग्रस्तांपर्यंत आवश्यक ती मदत व सहाय्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीला माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, मुंबई प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष एकनाथ गायकवाड, प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, माजी मंत्री कृपाशंकर सिंग, आमदार हरिभाऊ राठोड, माजी आमदार मोहन जोशी, मधुकर भावे, चरणजित सप्रा, संजय लाखे पाटील, देवानंद पवार, शाम पांडे यांची उपस्थिती होती.
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, पनवेल, बदलापूर, नवी मुंबई, रायगड, पेण, नाशिक, सांगली, कोल्हापूर यासह राज्याच्या विविध भागात महापुराने प्रचंड थैमान घातले आहे. याठिकाणी जनता जीव मुठीत घेऊन वावरत आहे. त्यामुळे राज्य सरकारने नैसर्गिक आपत्ती जाहिर करून पुरग्रस्तांना राष्ट्रीय आपदा व्यवस्थापन कायदा - २००५ नुसार एसडीआरएफ फंडातून तातडीने मदत वितरीत करावी, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली.
पूरपरिस्थितीमुळे राज्यात अनेकांनी जीव गमावला आहे. जनावरांच्या जीवितहानीची तर गणतीच नाही. घरात पाणी घुसल्याने कितीतरी कुटुंबांना घर सोडून इतरत्र आश्रय घ्यावा लागला आहे. अनेक भागातील वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे. अशा गंभीर परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री प्रचारात व्यस्त असल्याचे असंवेदनशील चित्र प्रथमच दिसत आहे. त्यामुळे राज्यभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेला मदतीचा हात द्यावा, असे कळकळीचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच जनतेनेसुद्धा अशा संकटसमयी घाबरून न जाता खंबीरपणे परिस्थितीचा सामना करावा व एकमेकांना मदतीचा हात द्यावा, असेही ते म्हणाले.