मुंबई - वडाळ्यातील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोणत्याही सुविधा नाहीत. त्यामुळे रुग्णालयातील नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असून रुग्णालयालगतच्या झोपडपट्टीमध्येही आता हळहळू कोरोना शिरकाव करत आहे. असे असतानाही बीपीटी व्यवस्थापन मनमानी करत रुग्णालय सील करण्यास नकार देत आहे. व्यवस्थापनाच्या या मुजोरीविरोधात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष मनोज संसारे यांनी शिवडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार एक-दोन दिवसांत रुग्णालय व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करत रुग्णालय सील केले नाही, तर जनआंदोलन करु, असा इशारा संसारे यांनी दिला आहे.
बीपीटीच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेले हे रुग्णालय काही दिवसांपूर्वी कोविड-१९ रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. मात्र, या रुग्णालयामध्ये पीपीई कीटच्या दर्जापासून स्वच्छतेपर्यंतच्या गोष्टींचा कसा बोजवारा आहे, कोरोनाग्रस्तांवर कसे उपचार केले जात आहेत, नर्सलाच कशी कोरोनाची लागण होत आहे, यासंबंधीची पोलखोल शनिवारी ईटीव्ही भारतने आपल्या विशेष वृत्ताद्वारे केली होती. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली होती. त्यानंतर बीपीटीचे अध्यक्ष संजय भाटीया यांनी हे वृत्त फेटाळले होते.
या रुग्णालयालगतच्या लाखो झोपडपट्टी वासियांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे मनोज संसारे यांनी रविवारी बीपीटी प्रशासनाशी चर्चा केली. मात्र, प्रशासन रुग्णालय सील करण्यास नकार देत आहे. त्यामुळे आता संसारे यांनी याविरोधात थेट गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेत शिवडी पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली आहे. लवकरच याविरोधात गुन्हा दाखल होईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे. तसेच एक-दोन दिवसांत रुग्णालय सील झाले नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देत पुढे जे काही होईल, त्याला बीपीटी प्रशासन जबाबदार असेल, असे ते म्हणाले. दरम्यान याविषयी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करत रुग्णालय सील करण्याची मागणी करणार असल्याचेही संसारे यांनी सांगितले आहे.