मुंबई - राज्याचे गृहरक्षक दलाचे प्रमुख व मुंबई पोलीस आयुक्तपद गमावलेले परमबीर सिंह यांच्या विरोधात मुंबई पोलीस खात्यातील एका पोलीस निरीक्षकाने आरोप केला आहे. परमबीरसिंह यांनी निलंबन मागे घेऊन पुन्हा सेवेत घेण्यासाठी पैसे मागितले होते, असा आरोप केला आहे. अनुप डांगे असे त्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.
मुंबईतील गावदेवी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पोलीस निरीक्षक पदावर अनुप डांगे कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी डर्टी बंस सोबो या पब वर 22 नौव्हेंबर 2019 रोजी कारवाई करण्यास सुरुवात केलेली होती. त्या वेळेस या पबचा मालक जितू नवलानी याने त्याचे परमबीर सिंह यांच्यासोबत घरचे संबंध असल्याचे सांगितले. तसेच या पोलीस पथकाला कारवाईस विरोध केला होता. यादरम्यान अनुप डांगे व त्यांच्या सहकार्यांचा पबमध्ये तीन जणांनी वाद झाला होता. त्यानंतर डांगे यांनी कारवाई केली होती.
आयुक्त पदावर आल्यावर परमबीर सिंग यांनी केले निलंबित-
त्या दिवसानंतर तत्कालीन लाच लुचपत विभागाचे प्रमुख परमबीर सिंह यांच्या कार्यालयमधून अनुप डांगे यांना भेटण्यासाठी फोन कॉल येत होते. या संदर्भातील माहिती अनुप डांगे यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना दिल्यानंतर त्यांनी परमबीर सिंह यांना भेटण्यासाठी जाण्यास स्पष्ट नकार देण्यास सांगितले. तसा लेखी पत्र व्यवहार सुद्धा करण्यास सांगितला होता. संजय बर्वे हे पोलीस आयुक्त पदावरून पायउतार झाल्यानंतर परमबीर सिंह यांनी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांना पोलीस नियंत्रण कक्षात पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना निलंबित सुद्धा करण्यात आले होते. या दरम्यान त्यांनी दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा म्हणून त्यांच्यावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप डांगे यांनी केला आहे.
सेवेत घेण्यासाठी ५० लाखांची मागणी-
अनुप डांगे यांनी पब चालक जितू नवलानी आणि भरत शहा व राजू भरत शहा यांच्या विरोधात पोलीस कारवाईत अडथळा निर्माण करणे , पोलिसांना मारहाण करणे यासारखे गुन्हे दाखल केले होते. हे गुन्हे मागे घ्यावेत म्हणून त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत होता. मात्र , त्यांनी त्यास नकार दिल्यामुळे त्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आलेली होती. त्यानंतर यासंदर्भात अनुप डांगे यांनी अतिरिक्त गृहसचिव यांना यासंदर्भात पत्र लिहून तक्रार दाखल केली होती. यानंतर अनुप डांगे यांच्याकडे शार्दुल बायास या व्यक्तीने तो परमवीर सिंग यांचे चुलत भाऊ असल्याचे सांगून पुन्हा सेवेत घेण्यासाठी 50 लाखांची मागणी केली होती. या संदर्भात चौकशीची मागणी अनुप डांगे या पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे.