मुंबई - सुशांतसिंह राजपूत प्रकरणी सलग तीन दिवस रिया चक्रवर्तीची सीबीआयने चौकशी केली आहे. यानंतर आता सुशांतसिंह राजपूत याची बहीण मितूसिंह हिला सीबीआयकडून समन्स बजावण्यात आला आहे. मुंबईतील डीआरडीओ गेस्ट हाऊस येथे सीबीआयचे पथक थांबले या ठिकाणी मितू सिंह आज चौकशीसाठी हजर राहणार आहे.
या प्रकरणात मितूसिंहने यापूर्वी बिहार पोलिसांना जबाब दिला होता. पोलिसांना दिलेल्या जबाबात बऱ्याच गोष्टी समोर आल्या होत्या. तिने ९ जून ते १२ जून दरम्यान सुशांतचा घरी घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला होता. तसेच, सुशांतच्या आत्महत्या करण्याआधी ८ जूनला रिया चक्रवर्ती व सुशांतसिंहमध्ये मोठे भांडण झाले होते. याबद्दलची माहिती स्वतः रियाने मीतूसिंहला फोन करून दिली होती. अशीही माहिती तिने पोलिसांना दिली होती. या पार्श्वभूमीवर आता मितूसिंहची चौकशी करण्यात येणार असून यासंदर्भात आणखी काय माहिती समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने शोविक चक्रवर्ती आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडाच्या घरी छापा टाकला आहे. त्यांचे ड्रग्स माफियासोबत संबंध होते का? हे देखील याद्वारे तपासले जाणार आहे. तसेच सॅम्युअल मिरांडाला ताब्यात घेतले आहे.