मुंबई: वसई विरार महानगरपालिकेच्या हजारो नागरिकांची पाण्याची समस्या अनेक वर्षांपासून आहे. हा प्रकल्प होण्यासाठी अनेक पातळीवर जनतेकडून पाठपुरावा होत होता. नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण यांच्यावतीने चारशे तीन एमएलडी पाणी शुद्धीकरण केंद्र बांधण्याचे सुरू आहे. या संपूर्ण पायाभूत संरचनेचे काम 98 टक्के पूर्ण झाले. पाण्यावर प्रक्रिया करण्याचे केंद्र 94 टक्के पूर्ण झालेले आहे.
शासनाने निर्देशित केलेला महत्त्वाचा प्रकल्प: तसेच या संदर्भात 88 किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचे काम एमएमआरडीएकडून सुरू आहे. त्याच पद्धतीने मेंढवन खिंडमध्ये देखील बोगदा बांधण्याचे काम आता पूर्ण झाले आहे. आता तुंगारेश्वर बोगदाचे काम आता अंतिम टप्प्यात सुरू आहे. टप्पा एकचे आता एमएमआरडीएकडून 95 टक्के काम पूर्ण झाले. संपूर्ण प्रकल्प 82 टक्के इतका पूर्ण झालेला आहे. सूर्या प्रकल्प हा एमएमआरडीएचा आणि शासनाने निर्देशित केलेला महत्त्वाचा प्रकल्प आहे.
पाणी पुरवठ्याला सुरुवात: पाण्याच्या समस्येच्या संदर्भात पायाभूत सुविधा जरुरी आहे. त्याशिवाय पुरेसे पाणी हजारो लाखो नागरिकांना मिळू शकणार नाही, हे वास्तव आहे. त्यामुळेच या प्रकल्पासाठी सातत्याने मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने गतीने काम करण्याचे नियोजन केले. या सूर्या प्रकल्पाच्या संदर्भात योजनेचा पहिला टप्पा यावर्षी वसई विरार महानगरपालिकेच्या सर्व नागरिकांना पाणी पुरवण्यासाठी असणारा प्रकल्प आहे. तो प्रकल्प पूर्ण होऊन पाणी पुरवठ्याला सुरुवात होईल. हा प्रकल्प मार्च 2023 मध्ये पूर्ण होईल. वसई शहराला त्याच्या अंतर्गत पाणी वितरण ज्या ठिकाणी केले जाते. त्या सर्व भागांमध्ये पाणी पोहोचवण्याचे काम सुरू होईल. यासंदर्भात मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून टप्पा दोनमधील शिल्लक 218 एमएलडी पाणी योजनेमधून देखील पाणी प्राप्त होईल.
निवडणुकीचा हंगाम सुरू: यासंदर्भात या भागातील ग्रामीण विकासामध्ये काम करणारे कार्यकर्ते आदेश बनसोडे यांनी सांगितले की, खरंतर शासनाने फार पूर्वीच सूर्या प्रकल्प पूर्ण करायला हवा होता. पायाभूत सुविधा नसल्यामुळे वसई विरार भागातील शहरी भागातील नागरिकांना पाण्याच्या मोठ्या समस्या आहेत. त्या पिण्याच्या पाण्यापासून ते वापरण्याचे पाणी आणि इतर ठिकाणी देखील पाणी नियमित मिळणे, ही समस्या आजही आहे. परंतु कदाचित निवडणुकीचा हंगाम सुरू झाल्यामुळे याकडे लक्ष दिले जात असावे, अशी टिप्पणी देखील त्यांनी केली. एमएमआरडीएकडून ठरवल्या वेळेमध्ये मार्च 2023 मध्ये हा प्रकल्प पूर्ण होतोय का? वसई विरार परिसरातील सर्व नागरिकांना वेळेत नियमित पाणी पुरवले जाते का? हे मार्च अखेर पाहता येईल.