मुंबई - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी १७ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. या मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिवंगत भारतनाना भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर भगीरथ भारत भालके हे राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढवत आहेत. आज निवडणुकीच्या प्रचारासाठी खासदर सुप्रिया सुळे या ब्रिच कँडी रुग्णालयातून व्हर्च्युअल माध्यमातून पंढरपुर-मंगळवेढा मतदारसंघात सभेसाठी हजर होत्या.
हेही वाचा - ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मुंबईत रुग्णांचे मृत्यू
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे सध्या मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. नुकतीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. सुप्रिया सुळे या एक मुलगी म्हणून रुग्णालयात आपल्या वडिलांची काळजी घेत आहेत. तर, दुसऱ्या बाजूला नेत्या म्हणून रुग्णालयातूनच आपल्या पक्षाचा उमेदवार विजयी व्हावा यासाठी सभाही घेत असल्याचे चित्र आज दिसले. ज्याप्रकारे शरद पवार हे स्वतःला झोकून देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरतात, तिच संघर्षमय वृत्ती आज सुप्रिया सुळे यांच्या कृतीतून दिसून आली.
सुप्रिया सुळे यांनी सभेत भागीरथ भालके यांना मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच, शरद पवार यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे त्यांना मतदारसंघात येऊन मतदारांसमक्ष भेटता येत नसल्याची खंत देखील त्यांनी बोलून दाखवली.
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात प्रचाराचा जोर
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक १७ एप्रिल रोजी होणार असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात प्रचार हा शिगेला पोहचलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भागीरथ भालके यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मतदारसंघात तळ ठोकून आहेत, तर तिथेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील गेल्या आठवड्यात भागीरथ भालके यांच्या प्रचारासाठी सभा आणि रॅली करताना दिसले. तर, तिथेच भगीरथ भालकेंच्या विरोधात भाजपने समाधान आवताडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी खुद्द माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही दिवस मंगळवेढा पंढरपूर या मतदारसंघात होते. त्यामुळे, दोन्ही पक्षांकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली गेली आहे. येणाऱ्या दिवसांत हा प्रचार शिगेला पोहचण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती : यंदाही चैत्यभूमी परिसर रिकामा