मुंबई - शिवसेनेचे उस्मानाबादचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांचे तिकीट कापून ओमराजे निबांळकर यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे गायकवाडांचे समर्थक नाराज झाले आहेत. या नाराजीतूनच गायकवाड समर्थक आपले राजीनामे देण्यासाठी मातोश्रीवर येत होते. मात्र, मुंबईत आलेल्या या कार्यकर्त्यांना दादर व वाशी येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांचे पक्षाने तिकीट कापल्याने कार्यकर्ते नाराज झालेत. ५ वर्षात खासदारांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडण्यासाठी शेकडो कार्यकर्ते उस्मानाबादहून मुंबईत दाखल झाले होते. परंतु या सर्व कार्यकर्त्यांच्या गाड्या पोलिसांनी वाशी टोल नाक्यावर अडवल्या आणि या कार्यकर्त्यांना तेथून परत पाठवले आहे.
वाशित दाखल झालेल्या या कार्यकर्त्यांना 'परत जा अन्यथा गुन्हे दाखल करू' असा दबाव टाकून पोलिसांनी माघारी पाठवले असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी यावेळी दिली. अखेर रवींद्र गायकवाडांच्या कार्यकर्त्यांनी माघारी जाण्याचा निर्णय घेतला.
खासदारांनी केलेल्या कामामुळे त्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्ते करीत होते. परंतु आपलंच सरकार असून अशाप्रकारे दबाव टाकण्यात आल्याने गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.