मुंबई - भांडूपमधील एका रक्तदात्याने रक्तदानाची शंभरी पूर्ण केली आहे. आजपर्यंत मी रक्तदान केले. मात्र, कोरोनाच्या संकटकाळात दान केलेले रक्त कोरोना योद्ध्यांसाठी आणि कोरोनाग्रस्तांसाठी कामी येईल. त्यामुळे या संकटात रक्तदानात शंभरीचा टप्प गाठल्याने आनंद होत असल्याचे त्या रक्तदात्याने सांगितले.
सुनील पोळ, असे या रक्तदात्याचे नाव आहे. पोळ हे अनेक सामाजिक संस्था तसेच लोकांना मदत करत असतात. तसेच देशात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत चालला आहे. त्यात मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत. या काळात डॉक्टर्स, परिचारिका, पालिका कर्मचारी, पोलीस काम करत आहेत. ते आजारी पडले तर त्यांना रक्ताची गरज पडेल म्हणून पोळ यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून जन्मदिनी पल्लवी रक्तपेढीत रक्तदान केले.
वडील अन् मामापासून प्रेरणा -
वडील तात्यासाहेब पोळ व मामा महादेव काटकर यांच्या सामाजिक कार्यापासून मी प्रेरित झालो. गुरू बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या 19 व्या वर्षांपासून रक्तदानाला सुरुवात केली. सामाजिक जाणिवेतून प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे, असे पोळ यांनी सांगितले.
एक रक्तदात्याच्या रक्तापासून तीन रुग्णांचे प्राण वाचवले जाऊ शकते. दान केलेल्या रक्ताचे विघटन करून रुग्णांच्या गरजेनुसार त्यातुन प्लेटलेट व प्लाझ्मा बनविले जातात व ते गंभीर स्वरुपाच्या आजारांवर उपचार करण्यासाठी वापरतात.