मुंबई - कांदिवली पूर्व येथे राहणारे निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना काल शिवसेनेच्या दोन शाखाप्रमुख व अन्य कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. यावर माजी निवृत्त अधिकारी कर्नल सुधीर सावंत यांनी संताप व्यक्त केला.
मी मदन शर्मा यांना भेटून आलो. काल क्रूरपणे त्यांच्यावर हल्ला झाला. त्यासंबंधातील मी सर्व सीसीटीव्ही फूटेज पाहिले. हे सर्व गुंड आतमध्ये घुसले आणि मारहाण केली. मदन शर्मा हे 90मध्ये निवृत्त झालेले असून त्यांचे वय 75 पर्यंत पोहोचलेले आहे. अशा वयस्कर व्यक्तीला क्रूरपणे मारहाण केलेली पाहून मला धक्का बसला, सुधीर सावंत म्हणाले.
सोशल माध्यमांवर राजनैतिक पोस्ट का केली, असा जाब विचारत 8 ते 10 जणांच्या टोळक्याने एका सेवानिवृत्त नौदलाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याचे समोर आले होते. मुंबईतील कांदिवली पूर्व येथे राहणाऱ्या मदन काशिनाथ शर्मा यांनी त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सोनिया गांधी व शरद पवार यांच्या फोटोला नमस्कार करणारा उद्धव ठाकरे यांचा फोटो फॉरवर्ड केला होता. तेव्हा त्या अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणात काल (शुक्रवार) रात्री 6 जणांना अटक केली होती. त्या सर्वांना आज जामीन मंजूर करण्यात आला आहे.