मुंबई- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. भाजपने काँग्रेस आमदारांना ५० कोटी रुपयांची ऑफर दिली असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. वडेट्टीवार यांच्या या आरोपावर मुनगंटीवार यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर प्रत्यारोप केले आहेत. ‘काँग्रेस नेत्यांनी आमदाराच्या खरेदी-विक्री संदर्भात खोटे कथन केले आहे’, असे मुनगंटीवार म्हणाले आहेत.
‘कोणताही पुरावा नसताना आपल्याच पक्षाच्या आमदारांवर शंका घेत काँग्रेस-राष्ट्रावादीचे आमदार विकावू आहेत', अशी भाषा वापरणे हा लोकशाहीचा अवमान आहे. आपल्याच आमदारांबाबत नेत्यांनी शंका घेत भाजप आमच्या आमदारांच्या खरेदी-विक्रीसाठी संपर्क करत आहे, अशी खोटी माहिती दिली आहे. भाजप कोणत्याही आमदाराच्या संपर्कात नाही आणि अशा कोणत्याच आमदारांच्या संपर्कात राहणार नाही. महाजनादेश हा शिवसेना, भाजप, आरपीआय आणि मित्रपक्षांच्या बाजूने आहे. महाजनादेशाचा आदर हेच आमचे लक्ष आहे आणि त्या दृष्टीनेच आम्ही या क्षणापर्यंत शिवसेना आणि महायुतीचे सरकार यावे हे सांगत आलो आहोत. कोणत्या आमदाराची खरेदी-विक्री होत आहे? काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पुरावे द्यावे, अन्यथा महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी ही भाजपची मागणी आहे’, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले