मुंबई : काल एका खासगी वाहिनीने भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमैया यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर याचे पडसाद आज विधापरिषदेत उमटणार यात काही शंका नव्हती. विशेष म्हणजे आतापर्यंत अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावून त्यांच्यामागे ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स या यंत्रणांचा ससेमिरा सोमैया यांनी लावला होता. मात्र, भाजप नेते किरीट सोमैया हे या कथित आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिपमुळे विरोधकांच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यामुळे विरोधकांसाठी आयती संधी चालून आली आहे. परंतु या संधीच सोन करा असा सल्ला खुद्द नेहमी रोखठोक भूमिका मांडणारे भाजप नेते, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप : २०१४ साली केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर राज्यात भाजप नेते किरीट सोमैया यांनी आतापर्यंत अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यातील अनेक नेत्यांना तुरुंगातही जावे लागेल आहे. विरोधी पक्षाचे नेते, खासदार, आमदार, पक्षाचे प्रमुखसुद्धा यातून सुटले नाहीत. यामध्ये माजी मंत्री, शिवसेना (उबाठा) गटाचे नेते अनिल परब यांच्यावरही साई रिसॉर्ट प्रकरणी किरीट सोमैया यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
संधीचे सोन करा : अनिल परब यांनी मला या प्रकरणात नाहक गुंतवण्यात आले असे सांगितले होते. मात्र, तरीदेखाल त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला होता. आता किरीट सोमैया स्वतः कचाट्यात सापडल्याने त्यांच्यावर हल्लाबोल करण्याची संधी विरोधक सोडतील तर नवलच. पण सभागृहात अनिल परब हा विषय मांडणार इतक्यात भाजप नेते, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अनिल परब यांना उद्देशून, संधी आहे, संधीचं सोन करा असे म्हटले. विशेष म्हणजे या प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा सभागृहात उपस्थित होते.
भाजप नेत्यांमध्येही नाराजी : भाजप नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार नेहमीच आपली भूमिका मांडतात. मुनगंटीवार हे पक्षातच नाही, तर सभागृहातही रोखठोक भूमिका मांडतात. त्यावेळी किरीट सोमैया यांच्या प्रकरणात अनिल परब यांना मुनगंटीवार यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. किरीट सोमैया यांनी ज्या प्रकारे विरोधकांवर आरोप केले त्यावरून भाजप नेत्यांमध्येही नाराजी होती का? असा प्रश्न मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावरुन पडला आहे.
बलिदान भाजप की पहचान : विरोधी पक्षातील अनेक नेत्यांवर किरीट सोमैया यांनी भ्रष्टाचाराचे आरोप लावले, त्या नेत्यांनी पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या चौकशा बंद झाल्या. यामागे कुणाचा हात होता असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. विरोधकांवर भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी दबाव होता का? याचा देखील विचार करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. याप्रसंगी एक दिवस असा येईल की, सचिन अहिर भाजपमध्ये येतील अशी भविष्यवाणीसुद्धा मुनगंटीवार यांनी केली. तसेच त्याग, तपस्या और बलिदान यही भाजप की पहचान, असे सभागृहात म्हटल्याने हा नेमका टोला कोणाला होता यावरही चर्चा सुरू झाली.
भुजबळसुद्धा अडीच वर्ष तुरुंगात : या मुद्द्यावर बोलताना अनिल परब म्हणाले की, एखाद्यावर आरोप झाले की, काय होते ते आम्ही अनुभवले आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर खोटा आरोप लावला जातो, तेव्हा तपास अधिकारी घाणेरडे प्रश्न विचारतात. छगन भुजबळांवरही खोटे आरोप झाले. त्यांना अडीच वर्षे तुरुंगात काढावी लागली. ज्या खासदाराचा व्हिडिओ व्हायरल झाला त्याची चौकशी करा. सर्वप्रथम त्याची सुरक्षा काढून घेण्यात यावी. उपमुख्यमंत्री सभागृहात असल्याने त्यांना हवी असलेली कोणतीही मोठी चौकशी ते करू शकतात. ती स्त्री कोण आहे? हे शोधणे सरकारचे काम आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणीही परब यांनी केली आहे.