मुंबई - राज्याच्या राजकारणात सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदार संघ चर्चेचा विषय झाला आहे. या मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकीय आव्हान प्रतिआव्हानांचा खेळ रंगू लागलाय. माढ्याचे राजकारण तापत असताना सहकारमंत्री सुभाष देशमुखांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना आव्हान दिले आहे. हिम्मत असेल तर पवारांनी माढा मतदार संघातून निवडणूक लढवूनच दाखवावी, असे आव्हान त्यांनी केले आहे.
माढ्याचे विद्यमान खासदार राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहितेपाटील यांचे पुत्र माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सोमवारी माजी खासदार दिवंगत हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे पुत्र आणि साताऱ्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केलेले हे दोन्ही नेते माढा मतदारसंघातले संभाव्य उमेदवार आहेत.
पवारांना त्यांचे पाप लागेल-
माढ्याच्या तिढ्यावर बोलताना सुभाष देशमुखांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरच हल्ला केला. पवार यांनी माढा मतदार संघातून माघार घेतली आहे. मात्र, सेनापतींनीच जर माघार घेतली तर सैन्याने कसे लढायचे, असा चिमटाही देशमुख यांनी पवारांना काढला. पवार यांनी सर्वच घटकांचा केवळ वापर करून घेतला, ते राष्ट्रवादीचे मालक बनलेत या भूमिकेतूनच त्यांनी केवळ आपल्याच लोकांना लाभ मिळवून दिला आहे. सामान्य जनतेला वेड्यात काढून त्यांची मदत घेऊन त्यांना धुळीला मिळवले असल्याचा आरोप देशमुखांनी पवारांवर केला. तसेच पवारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देशोधडीला लावले, त्याचे पाप पवार यांना लागणार असल्याचेही वक्तव्यही देशमुखांनी यावेळी केले.
माढ्यात आता भाजपची ताकद वाढली आहे. आता पवार यांनी माढ्यातून निवडणूक लढवावी, जनताच त्यांना घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही, असे आव्हान त्यांनी यावेळी पवारांना दिले आहे.