मुंबई - भारतासह अन्य प्रगत देशांमध्येही ‘मंदी’ची ओरड सुरू आहे. असे असतानाही आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांना ‘कँपस प्लेसमेंट’च्या पहिल्याच दिवशी तब्बल १ कोटी १७ लाख रुपयांची ‘पॅकेजस’ मिळाली आहेत. ३०० पेक्षा जास्त देशी-विदेशी कंपन्यांनी आयआयटी मुंबईला भेट दिली.
‘कँपस प्लेसमेंट’च्या पहिल्या दिवशी १७७ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. ६७ पैकी ३५ भारतीय आणि ३२ परदेशी कंपन्यांनी घसघशीत पगारांच्या नोकऱ्या दिल्या आहेत. दुसऱ्या दिवशीही विविध क्षेत्रांतील २१ कंपन्यांकडून १०० पेक्षा जास्त उत्तम पगाराच्या नोकऱ्या देण्यात आल्या. जपानच्या होंडा कंपनीने प्रतिवर्षी ८२ लाख रुपये, सोनीने ७८लाख ६३ हजार, एनईसीने ४३ लाख २८ हजार आणि टीएसएमसीने १७ लाख ९६ हजार अशा भरघोस वेतनाच्या आॅफर्स ‘आयआयटीयन्स’ देऊ केल्या आहेत. सिसमेक्स कॉर्पोरेशन (जपान), फ्लो ट्रेडर्स ( नेदरलँडस्) आणि मुराता (जपान) या कंपन्यांचाही यात समावेश आहे.
हेही वाचा - फुल्ल ढोसून झोपले तळीराम गुरुजी; विद्यार्थ्यांची पाटी राहिली कोरी
यावर्षी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी जास्त मागणी आहे. या दोन क्षेत्रांसाठी ३८२ जागा होत्या. त्या खालोखाल १८६ आयटी/ सॉफ्टवेअर क्षेत्राकरीता, अॅनॅलिटीक्समध्ये १७१, कन्सल्टिंगसाठी १२०, ‘फायनान्स’साठी ११६ अशा एकूण १० क्षेत्रांसाठी मुलाखती घेण्यात आल्या आहेत. पुढील काही दिवस ‘प्लेसमेंट्स’ सुरू राहणार असून, त्यावेळीही हेच चित्र असेल, अशी खात्री ‘आयआयटी’च्या अधिका-यांनी व्यक्त केली.