मुंबई- राज्यातील शाळांमध्ये सोमवारी ऑनलाइन शिक्षणाला सुरुवात झाली. पण मुंबईसह राज्यभरातील मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेटच्या कमी गतीमुळे ऑनलाइन शिक्षणाचा बोजवारा उडाल्याचे पालकांकडून सांगण्यात आले. सरकारने परिस्थिती आणि एकूणच वास्तव लक्षात न घेता ऑनलाईन शिक्षणाचा निर्णय लादला असल्याच्या प्रतिक्रिया पालकांमध्ये उमटल्याने, राज्यातील ऑनलाईन शिक्षणाची सुरुवातच ऑनलाईनच्या विविध समस्यांनी झाल्याचे दिसून आले.
शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. परंतु, नेटवर्क आणि विविध प्रकारच्या अडचणींमुळे शिक्षकांचा आवाज विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नव्हता. तर काही ठिकाणी शिक्षक आणि विद्यार्थांचा संपर्क तुटत होता. मुंबई, ठाणेसह राज्यातील अनेक भागात नेटवर्क समस्या निर्माण झाली. यामुळे ऑनलाईन शिक्षणात अडथळा निर्माण झाला. तर अनेक पालकांनी आपल्याकडे उच्च क्षमतेचा मोबाईल नाही, असे मत मांडले. तर अनेकांना लॅपटॉप व संगणक सुविधा उपलब्ध होण्यासाठी अडचणी असल्याचे पालकांनी शिक्षकांना सांगितले.
शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीव धोक्यात घालून मुलांना शाळेत पाठवायला पालक सध्यातरी धजावणार नाहीत. दुरदर्शन सारखे प्रभावी माध्यम, शैक्षणिक वाहिन्या राज्य सरकारने सुरू केल्या पाहिजेत, अशी मागणी हंसराज मोरारजी पब्लिक स्कुल अंधेरी येथील शिक्षक उदय नरे यांनी मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे यांच्याकडे केली आहे.
महापालिका शाळांत दीक्षा ॲपची अडचण...
मुंबई महापालिकेने २० हजारांहून अधिक शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण दिले, तसेच दीक्षा अँपची निर्मिती केली. परंतु, सायंकाळपर्यंत राज्य सरकारने आपल्या माध्यमिक शाळा ऑनलाईन सुरू करण्यासाठी कोणतेही मार्गदर्शक तत्वे जारी केली नव्हती.
मुंबईतील ४१ टक्के पालकांकडे अँड्राईड मोबाईल नाहीत...
मुंबई आणि परिसरात असलेल्या महापालिका, अनुदानित, खासगी शिक्षण संस्थांमधे पहिली ते दहावीपर्यंत शिकत असलेल्या तब्बल ४१ टक्के पालक आणि विद्यार्थ्यांकडे अद्याही अँड्राईड मोबाईल नाहीत. तर कोरोनाच्या भीतीमुळे मुंबई सोडून आपल्या गावी गेलेल्या ३२ टक्के विद्यार्थ्यांचा अद्यापही संपर्क होत नसल्याने, पहिल्या दिवशी हजारो विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून दूर राहिले आहेत. त्यामुळे शिक्षणाचा मोठा फज्जा उडणार असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे.
देशभरात ५६ टक्के विद्यार्थी डिजीटल शिक्षणापासून वंचित...
महाराष्ट्रसोबत देशातील २२ राज्यांमध्ये ऑनलाईन शिक्षणाच्या संदर्भात करण्यात आलेल्या एका 'सिनेरिओ अमिडस्ट कोविड १९ ऑनग्राऊंड सिच्युएशन अँड पॉसिबल सोल्युशन्स' नावाच्या अभ्यास अहवालानुसार, ५६.१ टक्के मुलांकडे स्मार्टफोन नाहीत. तर ३१.१ टक्के मुलांच्या घरी अजूनही टीव्ही नसल्याचे समोर आले आहे.