मुंबई- शहरी भागातील काही अपवाद वगळला तर राज्यातील बहुतांश ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण पोहोचलेले नाही. यामुळे ऑनलाइन शिक्षण ज्या विद्यार्थ्यांना मिळत आहे, त्यांचे मुल्यांकन करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅपवर मुल्यांकन कण्यासाठी स्वाध्याय नावाचा उपक्रम आणला आहे. यासाठी शिक्षण विभागाच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने महत्वाची भूमिका बजावली आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने लिडरशिप फॉर इक्विटी आणि कन्व्होजीनियस यांच्या सहकार्याने राज्यातील विद्यार्थ्यांपर्यंत संपर्क आणि संवादाचे माध्यम म्हणून व्हाट्सअॅप वापरून स्वाध्याय उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू केले आहे. यासाठी खास पद्धतीने काही कार्यक्रम तयार करण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व इयत्तांमधील विद्यार्थ्यांच्या फोनवर प्रश्नमंजुषा उपलब्ध असतील, आणि त्याचा उपयोग करून शिक्षक, विद्यार्थी आणि पालक विद्यार्थ्यांच्या सद्य:स्थितीबद्दल नियमित माहिती मिळवू शकतील. हे मुख्यतः राज्यातील विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान वाढवण्याचे एक साधन म्हणून वापरले जाणार आहे.
सुरूवातीला या उपक्रमात मराठी आणि सेमी-इंग्रजी माध्यमासाठी मराठी आणि गणिताचे विषय सुरू करण्यात आले आहे. येत्या काही दिवसात गुजराती, उर्दू, हिंदी या विषयातही हा उपक्रम सुरू केला जाणार आहे.
स्वाध्याय उपक्रमाचे खास वैशिष्ट्ये पुढीळ प्रमाणे..
स्वाध्याय उपक्रमात एका स्मार्ट फोनद्वारे १०० विद्यार्थी व्यस्त राहू शकतात. तरी ज्या विद्यार्थ्यांकडे म्हणजेच त्यांच्या पालकांकडे स्मार्ट फोन नसतील ते देखील या उपक्रमात सामील होऊ शकतात. शिक्षक, स्वयंसेवक, एसएमसी, एसएमडीसी सदस्य, गावातील किंवा वस्ती पातळीवरील स्थानिक तरुण स्वतःचे स्मार्ट फोन वापरून एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना गुंतवू शकतात, सहभागी करून घेऊ शकतात, यासाठी खास सोय करण्यात आली आहे.
या उपक्रमात वस्तुनिष्ठ डेटा संकलन
इतर राज्यांत संकलित माहितीमध्ये डेटामध्ये एनएएस प्रमाणेच कल दिसून आला आहे. तसेच, संकलित केलेली माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी सामंजस्य करार केला जाणार आहे. माहितीबाबत कोणत्याही गैरप्रकाराबद्दल कठोर कारवाई आणि दंड आकारला जाणार आहे.
सरावासाठी प्रोत्साहित केले जाणार
स्वाध्याय उपक्रमांतर्गत दर शनिवारी विद्यार्थ्यांना गणितातील १० आणि भाषेतील १० प्रश्न सरावासाठी पाठवून त्यांना सरावासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. तसेच, हे प्रश्न त्या त्या इयत्ता आणि विषयाच्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित असणार आहे. विद्यार्थ्यांकडे सराव करण्यासाठी आठवडाभराचा वेळ असेल, जेणेकरून ते त्यांच्या वैयक्तिक सोयीनुसार सराव निवडू शकतात.
सरावासाठी मिळणार साहित्य
विद्यार्थी, विद्यार्थिनीने सर्व प्रश्नांची उत्तरे देताच लगेचच तिची किंवा त्याची कामगिरी त्यांना शेअर केली जाईल. अशा प्रकारे विद्यार्थी त्यांच्या स्वतःच्या कामगिरीचे स्वत:च मुल्यांकन करू शकतील आणि सक्षम होऊ शकतील. विद्यार्थ्यांना सराव करण्यासाठी आणि ज्या भागासाठी मदत हवी आहे त्यासाठी उपचारात्मक साहित्य (उदा. ई साहित्य) त्या नंबरवर पाठवले जाईल.
शिक्षकांना समजणार कामगिरी
संकलित केलेल्या माहितीद्वारे आपणास राज्य, जिल्हा, केंद्र आणि शाळा स्तरावरील विद्यार्थ्यांचा सहभाग आणि कामगिरी समजत राहील. शिवाय, शिक्षकांनासुद्धा त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांची कामगिरी देखील प्रदान केली जाईल. परिणामी, शिक्षक त्याच्या स्तरावर विद्यार्थ्यांसाठी अधिक चांगल्या प्रकारे उपाय योजना करू शकतील, अशा प्रकारचे या स्वाध्यायमध्ये नियोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा- बेस्टच्या ३४ हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, मिळणार 'इतका' बोनस