मुंबई - नेरूळ स्टेशनजवळ पश्चिमला दैनंदिन बाजार आहे. मात्र, या बाजारातील टाकाऊ वस्तू बाजुला असलेल्या सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर टाकल्या जात आहे. त्यामुळे, या जागेला डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जवळच व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांकडून अस्वच्छता केली जात आहे. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने तेथील लोकांना त्रास होत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छ भारत अभियान राबवले जात आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, तसेच घाण केल्यानंतर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. परंतु, असे असताना नेरूळ स्टेशनजवळ असलेल्या मोकळ्या भूखंडावर कचरा टाकला जात आहे. या ठिकाणी असलेल्या दैनंदिन बाजारावर पालिकेच्या माध्यमातून कारवाई करण्यात येते. मात्र, पुन्हा बाजार बसविण्यात आला आहे.
संबंधित विक्रेत्यांकडून परिसरात घाण केली जात आहे. तिथेच उरलेली भाजी, फळे, मासळी, आणि इतर वस्तू टाकल्या जातात. तसेच रस काढून उरलेला उसाचा चोथाही तिथे जमा केला जातो. काही जुन्या हातगाड्या तिथे टाकण्यात आल्या. आतमध्ये प्रवेश करायच्या ठिकाणी हातगाड्या लावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे.
बाजूला टाकाऊ माल सडून त्याची दुर्गंधी येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या विक्रेत्यांनी सिडकोच्या माध्यमातून बांधलेली भिंतही तोडली आहे. आम्ही दरवेळी या विक्रेत्यांवर कारवाई करतो. मात्र, ते पुन्हा आपले बस्तान बसवितात. मात्र, या प्रकरणी कोणी दोषी असेल ते त्यांच्यावर उचित कारवाई करण्यात येईल, असे सिडकोचे अनधिकृत बांधकाम नियंत्रक सुनील तांबे यांनी सांगितले आहे. नवी मुंबईत कित्येक भूखंडावर अशी परिस्थिती असून सिडकोच्या माध्यमातून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
हेही वाचा- भाजप नेते उद्या राज्यपालांना भेटणार, सत्ता स्थापनेचा करणार दावा?