मुंबई - दिशा सालियन मृत्यू प्रकरणी ( Disha Salian Suicide ) महाराष्ट्रात सध्या भाजप ( Bjp ) आणि शिवसेनामध्ये ( Shivsena ) वाद सुरू आहे. दिशाच्या मृत्यूप्रकरणी सध्या जे राजकारण सुरू आहे त्याविरोधात दिशा सालियनच्या आई-वडिलांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते यांच्यासह देशातील मान्यवरांना पत्र लिहिले आहे. ( Disha Salian Parents Letter ) या पत्रातून त्यांनी दिशा सालियनची बदनामी रोखावी, अशी विनंती ( Disha Salian Parents Request ) केली आहे.
पत्रात काय?
दिशा सालियनच्या आई वडिलांनी यांनी म्हटले आहे, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे हे माझ्या मुलीची बदनामी करत आहेत. आमच्या मुलीचे नाव काही राजकारण्यांना बदनाम करण्यासाठी वापरले जात आहे. हे सर्व थांबवण्यासाठी आम्ही मी सतीश सालियन आणि माझी पत्नी वासंती सालियन देशातील महत्त्वाच्या लोकांना पत्र लिहून आमच्या मुलीची बदनामी रोखण्याचे आवाहन करीत आहोत. हे पत्र आम्ही राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देशातील महत्त्वाच्या व्यक्ती आणि मान्यवरांना पाठवले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनाही हे पत्र पाठवले आहे.
आमची मुलगी दिशा सालियन हिचा 8 जून 2020 रोजी मालाड मालवणी येथील फ्लॅटमध्ये मृत्यू झाला. दिशा कोरोना महामारी आणि लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे तणावात होती. कामाचा तिच्यावर ताण होता. आत्महत्येपूर्वी तिने तिच्या जवळच्या मित्रांना फोन करून कामाच्या तणावाबाबत माहिती दिली होती. या तणावामुळेच तिने 12 मजल्यावरून तिच्या राहत्या घरातून उडी घेतली. त्यात तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनेची चौकशी करून ही आत्महत्या असल्याचे स्पष्ट केले होते. दिशाने कामाच्या ताणातून आत्महत्या केली असली तरी काही राजकारण्यांनी सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांना दिशाभूल करणारी चुकीची माहिती देत आमच्या मुलीची बदनामी केली आहे. तिने आत्महत्या केली असतानाही तिच्यावर बलात्कार झाल्याची दिशाभूल करणारी माहिती त्यांनी पसरवली. यामुळे आमच्या मुलीची बदनामी होत आहे.
हेही वाचा - NIA raids espionage case : हेरगिरी प्रकरणी एनआयएची बुलढाणा शहरात छापेमारी
दिशा 4 जून 2020 पासून घराबाहेरच पडली नव्हती. हे इमारतीच्या सीसीटीव्ही फूटेजमधून स्पष्ट झाले आहे. असे असतानाही काही राजकारण्यांनी तिच्यावर बलात्कार झाल्याचे प्रसारमाध्यमात पसरवले. या घटनांमुळे आम्हाला मानसिक त्रास होत आहे. तसेच आमच्या मुलीचीही बदनामी होत आहे. आमच्या मुलीच्या आत्महत्येचा ते राजकीय फायद्यासाठी वापर करत असून बिनबुडाचे आरोप करत आहेत, असे दिशाचे वडिल सतीश सालियन यांनी पत्रात म्हटले आहे. या घटनांमुळे त्रास होत असून हे थांबवण्यासाठी हे पत्र लिहिले असल्याचे सतीश सालियन यांनी स्पष्ट केले आहे.