मुंबई - कोव्हिडच्या लढ्यात आज सर्वात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या इंटर्न आणि निवासी डॉक्टरांच्या स्टायपेंडमध्ये मोठी वाढ मुंबई महानगरपालिकेने केली आहे. तर आता पालिकेने कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन (सीपीएस) संलग्नित निवासी डॉक्टरांनाही मोठा दिलासा दिला आहे. या डॉक्टरांच्या स्टायपेंडमध्ये वाढ करत आता त्यांना 54 हजार रुपये स्टायपेंड देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
एमबीबीएस झाल्यानंतर पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम घेण्यासाठी हजारो विद्यार्थी नीट परीक्षा देतात. नीट पास होणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना रँक अभावी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वा खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही असे विद्यार्थी कॉलेज ऑफ फिजिशियन अँड रिसर्च संलग्नित पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा पर्याय निवडतात. असे अंदाजे 4 हजार डॉक्टर राज्यभर आहेत. तर मुंबईत पालिका रुग्णालयात सीपीएसचे अंदाजे 500 डॉक्टर कार्यरत आहेत. आज हे सर्व डॉक्टर कूपर, कुर्ला भाभा, वांद्रे भाभा, ट्रॉमा केअर अशा पालिकेच्या रुग्णालयात कोरोनाशी दोन हात करत आहेत. असे असताना इंटर्न आणि निवासी डॉक्टरांना पालिकेने कोव्हिडच्या काळासाठी चांगली स्टायपेंड वाढ दिली आहे. इंटर्न डॉक्टरांना 6 हजारावरून 11 हजार कायमस्वरुपी वाढ तर कोव्हिडसाठी अतिरिक्त 39 हजाराची वाढ दिली आहे. तर मार्डच्या निवासी डॉक्टरांना कोव्हिड काळासाठी 10 हजारांची वाढ देण्यात आली आहे. तर नव्याने नियुक्त करण्यात येणाऱ्या डॉक्टरांना 80 हजार आणि 2 लाख पगार देण्यात येणार आहे.
अशा वेळी सीपीएस डॉक्टरांना मात्र कोणतीही स्टायपेंड वाढ मिळालेली नव्हती. गेल्या कित्येक वर्षांपासून हे डॉक्टर 14800 रुपयात रुग्ण सेवा देत आहेत. त्यामुळे आपल्या ही स्टायपेंडमध्ये वाढ करावी, अशी मागणी या डॉक्टरांनी उचलून धरली होती. ही मागणी अखेर आज मान्य झाली आहे. सीपीएस डॉक्टर आणि महापौर यांच्यात आज एक बैठक झाली. या बैठकीत पालिका रुग्णालयातील या डॉक्टरांना कायमस्वरूपी 54 हजार स्टायपेंड देण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारी आणि पालिका रुग्णालयातील मार्ड डॉक्टरांप्रमाणेच आता या डॉक्टरांना ही 54 हजार स्टायपेंड देण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले आहे. तर यासंबंधीच्या अध्यादेश लवकरच जारी होईल, असे ही त्या म्हणाल्या.
या निर्णयावर सीपीएस डॉक्टरांनी आनंद व्यक्त केला आहे. पण जोपर्यंत अध्यादेश निघत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आनंद व्यक्त करता येणार नाही, अशी प्रतिक्रिया काही सीपीएस डॉक्टरांनी दिली आहे.