मुंबई - म्हाडाच्या इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने काही दिवसांपूर्वी 18 अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली. मात्र, या इमारतींतील रहिवाशांना बाहेर काढून त्यांना स्थलांतरीत करण्याची प्रक्रिया काही पूर्ण केलेली नाही. त्यामुळेच आजही 100 पेक्षा जास्त रहिवासी या इमारतीमध्ये राहत आहेत. काल(गुरुवार) झालेल्या भानुशाली इमारत दुर्घटनेनंतर दुरुस्ती मंडळाला जाग आली आहे. त्यानुसार आता जे रहिवासी स्थलांतरित होण्यास नकार देतील, त्यांना बळाचा वापर करत बाहेर काढले जाणार आहे. मंडळाचे सह मुख्य अधिकारी अनिल अंकलगी यांनी ही माहिती दिली.
पावसाळ्यापूर्वी 16 हजार उपकरप्राप्त इमारतींचे सर्व्हेक्षण करत मे महिन्याच्या मध्यावर अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. त्यानुसार या अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. आवश्यकतेनुसार धोकादायक इमारतींच्या दुरुस्तीचे काम म्हाडा मंडळ किंवा मालकाच्या माध्यमातून हाती घेतले जाते. अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना म्हाडाच्या संक्रमण शिबिरात स्थलांतरीत केले जाते. अन्यथा रहिवासी स्वतः राहण्याची व्यवस्था करतात. दरम्यान, जे रहिवासी बाहेर निघण्यास विरोध करतात त्यांचा पाणी आणि वीजपुरवठा खंडित करत, प्रसंगी पोलीस बळाचा वापर करत बाहेर काढण्याचा अधिकार मंडळाला आहे. मात्र, या अधिकाराचा मंडळाकडून म्हणावा तसा प्रभावी वापर होताना दिसत नाही. त्यामुळेच कित्येक रहिवासी अद्याप अतिधोकादायक इमारतीत वास्तव्य करत आहेत.
यंदा कोरोनामुळे सर्व्हेक्षण करण्यास आणि पर्यायाने यादी जाहीर करण्यास मोठा विलंब झाला. मे महिन्याऐवजी 10 जूनला यादी जाहीर करण्यात आली. यात 18 अतिधोकादायक इमारतींचा समावेश आहे. या अतिधोकादायक इमारतींमध्ये ३१७ निवासी व २२३ अनिवासी असे एकूण ५४० रहिवासी/भाडेकरू आहेत. 121 निवासी भाडेकरू/रहिवाशांनी त्यांची व्यवस्था करत घरे रिकामी केली आहेत. त्यामुळे उर्वरीत 354 रहिवाशांना स्थलांतरित करण्याची जबाबदारी मंडळावर होती. त्यानुसार 10 जूनपर्यंत केवळ 20 रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आले होते. त्यानंतर किती रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आले याबाबत अनिल अंकलगी यांना विचारले असता, त्यांनी अजूनही अंदाजे 100 रहिवासी राहत असल्याची माहिती दिली. पावसाळ्यातील धोका लक्षात घेता मंडळाने या रहिवाशांना बाहेर काढत इमारती रिकाम्या करून घेणे आवश्यक आहे. मात्र, अद्यापही हे काम झालेले नाही. त्यामुळे पुन्हा भानुशालीसारखी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
18 अतिधोकादायक इमारतींची यादी -
१) इमारत क्रमांक १४४, एमजीरोड,अ- ११६३ (मागील वर्षीच्या यादीतील)
२) इमारत क्रमांक ५०-५८, एम सारंग स्ट्रीट/ओल्ड नागपाडा क्रॉस लेन,
३) इमारत क्रमांक १०१-१११, बारा इमारत रोड, (मागील वर्षीच्या यादीतील)
४) इमारत क्रमांक ७४ निजाम स्ट्रीट, (मागील वर्षीच्या यादीतील)
५) इमारत क्रमांक १२३, किका स्ट्रीट (मागील वर्षीच्या यादीतील)
६) इमारत क्रमांक २४२-२४४, बारा इमाम रोड,
७) इमारत क्रमांक १६६ डी, मुंबादेवी रोड,
८) इमारत क्रमांक २३७, संत सेना महाराज मार्ग
९) इमारत क्रमांक २३९, संत सेना महाराज मार्ग
१०) इमारत क्रमांक १४ भंडारी स्ट्रीट
११) इमारत क्रमांक १२ (२) नानुभाई बेहरमजी रोड
१२) इमारत क्रमांक ३८७-३९१, बदाम वाडी, व्ही.पी. रोड (मागील वर्षीच्या यादीतील)
१३) इमारत क्रमांक ३९१ डी, बदाम वाडी व्ही.पी. रोड (मागील वर्षीच्या यादीतील)
१४) इमारत क्रमांक ४४३ वांदेकर मेंशन, डी ४३१, डॉक्टर दादासाहेब भडकमकर मार्ग, गिरगाव (मागील वर्षीच्या यादीतील)
१५) इमारत क्रमांक २७३-२८१, फॉकलॅंड रोड (डी- २२९९-२३०१),
१६) इमारत क्रमांक १, खेतवाडी, १२ वी गल्ली (डी २०४९) ,
१७) इमारत क्रमांक १०० डी, न्यू स्टार मेंशन, शाहीर अमर शेख, जेकब सर्कल, ग दक्षिण- ४८(२२),
१८) इमारत क्रमांक ४४, मोरलॅंड रोड, सिराज मंझिल.
दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचा नियंत्रण कक्ष
रजनी महल, पहिला मजला, ८९-९५, ताडदेव रोड, ताडदेव, मुंबई- ४०००३४. दूरध्वनी क्रमांक - २३५३६९४५, २३५१७४२३. भ्रमणध्वनी क्रमांक - ९१६७५५२११२.