मुंबई - खेड्यापाड्यात प्रवाशांना अहोरात्र सेवा देणाऱ्या लालपरीने म्हणजे परिवहन महामंडळाच्या एसटीने आज 72 व्या वर्षांत पदार्पण केल आहे. एसटीच्या वर्धापनदिनानिमित्त परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच एसटीचे गतवैभव पुन्हा मिळवून देणार, असा विश्वास व्यक्त केला.
एसटीचे गतवैभव पुन्हा मिळवून देणे हे आपले कर्तव्य आहे. देशावर कोरोनाचे संकट आले. त्यातच राज्यामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. तसेच इतर परप्रांतीय मजूर राज्यात अडकून पडले होते. या करोनाच्या संकटात एसटीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एसटीने जवळपास 5 लाख मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. रुग्णवाहिका म्हणून एसटी आपल कर्तव्य बजावत आहे, तर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची ने-आण देखील एसटी करते, असे परब म्हणाले. तसेच एसटीच्या कामाचे श्रेय एसटी कर्मचारी, प्रशासनाला दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एसटीला पुन्हा गतवैभव मिळून देणार, असा विश्वासही अनिल परब यांनी व्यक्त केला.