मुंबई - राज्यभरात गेल्या वर्षीपासून कोविडच्या विविध कामांसाठी नेमलेल्या शिक्षकांना सुटीकाळात केलेल्या कामाच्या बदली रजा अजूनही शालेय शिक्षण विभागाने मंजूर केलेली नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये शासनाविरोधात प्रचंड नाराजीचे वातवरण आहे. शासन राज्यातील शिक्षकांची अवहेलना करत दुर्लक्ष करत असल्याची टीका भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी केली.
शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी
राज्यभरात कोरोनाच्या दुसर्या लाटेला थोपविण्यासाठी राज्य सरकारने कडक लॉकडाऊन लागू केला आहे. तसेच आरोग्य यंत्रणेवर ताण येत असल्याने राज्य शासनाने ताण कमी करण्यासाठी राज्यातील 25 हजारांहून अधिक शिक्षकांना कोरोना ड्युटी लावली आहे. शासनाचा नियमांचा धाक दाखवत शिक्षकांना उन्हाळी व दिवाळी सुट्यांच्या कालावधीत कोविड कामाला जुंपण्यात आले होते. राज्यातील अनेक जिल्ह्यात शिक्षकांना विलगीकरण कक्ष, सर्वेक्षण, चेक पोस्ट व अन्य ठिकाणी नियुक्त करण्यात आले. अशा ठिकाणी कोरोना संसर्गाची शक्यता अधिक असते. तरीही स्वतःच्या जीवाची काळजी न करता आपली सेवा देत आहे. या सेवा देत असताना अनेक शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, आता नियमानुसार, शिक्षकांनी सुटीकाळात केलेल्या कामाच्या बदली रजा अजूनही शालेय शिक्षण विभागाने मंजूर केली नाही. त्यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये शालेय शिक्षण विभागात प्रचंड नाराजी आहे.
काय आहे बदली रजेचा नियम
सुट्यांच्या बाबतीत महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, १९७७ सन १९७८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक (१८) (अ) नुसार बदली रजा देता येते. नुसार जर माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापकाव्यतिरिक्त एखादा स्थायी कर्मचारी मोठ्या सुट्यांना हक्कदार आहे. एखाद्या वर्षात पूर्ण मोठ्या सुट्यांचा किंवा त्यांच्या एखाद्या भागाचा लाभ घेण्यास प्रतिबंध झालेला असेल तर, त्याबद्दल त्याला पूर्ण सुटीशी त्याने सुटीच्या न उपभोगलेल्या दिवसांच्या संख्येचे जे प्रमाण असेल त्या प्रमाणात वार्षिक 30 दिवसांच्या अर्जित रजेची प्रमाणशीर असलेल्या संख्येएवढी अर्जित रजा अनुज्ञेय असते. याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांना पत्र पाठवून तातडीने शिक्षकांच्या बदली रजा मंजूर करण्याची मागणी आम्ही केली आहे, अशी माहिती भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी सांगितले.
हेही वाचा - विधानसभा अध्यक्ष पदाबाबत राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांना स्मरण पत्र