मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरत आहे. आरोग्य विभागावर कोट्यवधी रुपये खर्च करणारी मुंबई महानगरपालिका नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. आता आरोग्य यंत्रणा हाताळण्यासाठी केंद्राने सैन्याला पाचारण करावे, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
राणे यांनी काल सायन रुग्णालयातील वार्ड क्रमांक पाच येथील व्हिडिओ ट्विटवर अपलोड केला होता. त्या व्हिडिओनंतर सर्वत्र आरोग्य यंत्रणेबाबत नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत राणे म्हणाले की, सायन रुग्णालयात कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांचे शव बाजूला ठेवूनच तेथील इतर रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
धारावी, अँटोपहील, माटुंगा या भागातील रुग्ण सायन रुग्णालयात उपचार घेत आहेत. धारावीसारख्या वस्तीत कोरोनाचा तीव्र फैलाव होत असल्याचे निदर्शनाला येत आहेत. त्याच धारावीपासून हाकेच्या अंतरावर सायन रुग्णालय आहे. या रुग्णालयात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालला असल्याचे चित्र समोर आले, असल्याचे राणे यांनी सांगितले.
राज्यातील आरोग्यविषयक स्थिती चांगली नाही, या संदर्भात केंद्राने हस्तक्षेप करून मुंबईमध्ये आरोग्य यंत्रणा हाताळण्यासाठी सैन्याला पाचारण करावे, अशी मागणी नितेश राणे यांनी ई टीव्ही भारतसोबत बोलताना केली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे शव इतर रुग्णांपासून वेगळ्या ठिकाणी ठेवले जात नाही. त्या ठिकाणी उपचार घेणाऱया रुग्णांसाठी, उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठीही ही धोक्याची बाब असल्याचे राणे यांनी सांगितले.