मुंबई - मुंबईची दुसरी लाइफलाइन असलेली बेस्ट पूर्ण क्षमतेने चालवण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. कोरोनाच्या काळात बेस्टच्या बसेसमधून सोशल डिस्टनसिंगचे पालन करत एका सीटवर एक प्रवासी तर उभे 5 प्रवासी नेण्याची परवानगी होती. पूर्ण क्षमतेने बससेवा सुरू करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी बेस्टने राज्य सरकारकडे केली होती. त्यानुसार राज्य सरकारने परवानगी देणारे पत्र बेस्टला पाठवले आहे.
सर्वसामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात न आल्याने सर्वसामान्य मुंबईकरांचे प्रवास करताना अतिशय हाल होत आहेत. मात्र, आजपासूनच बेस्टच्या बसेस पूर्ण क्षमतेने चालवल्या जातील अशी, माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली आहे. याचा फायदा लाखो प्रवाशांना होणार आहे.
तसेच, लोकलमधून प्रवास करण्याची मुभा राज्य सरकारने महिलांना दिली आहे. महिलांसाठी मुंबईत सकाळी 11 ते दुपारी 3 आणि सांयकाळी 7 ते रात्री शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. लोकल सुरू झाल्यामुळे महिलांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र प्रत्यक्षात स्टेशनवर महिलांची तुरळक गर्दी दिसत आहे.