मुंबई - राजधानी मुंबईत कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी संचार बंदी करण्यात आली असून केवळ अत्यावश्यक सेवेची वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. या काळात गुटखा, पानमसाल्या सारख्या तंबाखूजन्य पदार्थांच्या वाहतूकीवर बंदी आहे. असे असतानाही वाहनावर अत्यावश्यक सेवेचे स्टिकर चिटकवून प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या युनिट ११ ने ही कारवाई करून आरोपींकडून 39 लाख 65 हजार किमतीचा गुटखा आणि पानमसाला जप्त केला.
कांदिवली पश्चिममधील हिंदुस्तान नाका येथे सोमवारी ही कारवाई करण्यात आली आहे. युनिट 11 ला मिळालेल्या गुप्त माहितीवरून हिंदुस्तान नाक्यावर सापळा लावण्यात आला होता. एमएच 04 एवाय 1734 या क्रमांकाचा ट्रक पोलिसांनी पकडला असता या ट्रकमध्ये तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी या प्रकरणात 2 आरोपींना अटक करून एकूण 51 लाख 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मुसाहिद अहमद मसगुल अहमद शेख (वय-33), मोहम्मद अमानुल्ला खान (वय-25) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींची पोलिसांनी चौकशी केली असता मुंबई शहरात परराज्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा आणणारी टोळी सक्रिय असल्याचे समोर आले आहे. या आरोपींना न्यायालयाने 16 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.